भारतीय हवामान विभागाने (IMD) अद्याप पावसाळा संपण्याची अधिकृत घोषणा केली नसतानाही शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. गुरुवारी (दि. ९) संध्याकाळी मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १०५ वर पोहोचला. त्यामुळे मान्सून काळात 'चांगल्या' श्रेणीत असलेली हवा आता 'मध्यम' श्रेणीत गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचू शकते.
AQI १०० च्या पुढे; काही भागांत तीव्र प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, गेल्या शनिवारी मुंबईचा AQI ४९ होता. तो रविवारी ६१, बुधवारी ७१ आणि गुरुवारी १०५ वर गेला. शहरातील काही भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण अधिक आढळले असून, शिवडी येथे सर्वाधिक १५८, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (१४८), देवनार (१४७) आणि बोरीवली (११३) असा AQI नोंदवण्यात आला.
AQI पातळी ०-५० दरम्यान चांगली, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० खराब, ३०१-४०० अत्यंत खराब आणि ४०० पेक्षा जास्त गंभीर मानली जाते. सध्या मुंबईतील हवा मध्यम श्रेणीत असून, काही ठिकाणी ती 'खराब' दिशेने सरकत आहे.
मान्सून ओसरताच वाढले प्रदूषण
मान्सून काळात वारंवार झालेल्या पावसामुळे धूलिकण धुऊन निघाल्याने प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्याने वाढलेले तापमान आणि स्थिर हवामानामुळे वातावरणात धूर व धूळ साचू लागले आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ, तसेच आगामी दिवाळीतील फटाक्यांचा धूर या कारणांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे.
AQI ३५० च्या वर जाण्याची शक्यता - तज्ज्ञांचा इशारा
बॉम्बे एन्व्हायरमेंट अॅक्शन ग्रुप (BEAG) चे सदस्य आणि वैज्ञानिक डॉ. तुहिन बॅनर्जी यांनी इशारा दिला की, "या हिवाळ्यात मुंबईतील हवेचे प्रदूषण मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असू शकते. हवामानातील बदलांमुळे वाऱ्यांचे स्वरूप विस्कळीत होईल आणि आधीच कमी असलेले वारे आणखी दुर्बल होऊ शकतात. वाऱ्यांचा अभाव राहिल्यास AQI पातळी ३५० च्या वर जाण्याची शक्यता आहे."
प्रशासनाला तज्ज्ञांचा इशारा
IMD ने अद्याप मान्सून समाप्तीची अधिकृत घोषणा केली नसल्याने, शहर प्रशासनाने दीर्घकाळ टिकणाऱ्या हवेच्या खराब गुणवत्तेसाठी आधीच तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे.