मेघा कुचिक/मुंबई :
अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात टॅक्सीच्या चाकाखाली येऊन एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा मुलगा इमारतीसमोर चालत असताना टॅक्सीने इमारतीच्या गेटमधून आत प्रवेश केला अन् हा अपघात घडला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी कॅब चालकाविरोधात एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. मोहम्मद रिझवान असे आरोपी चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल समद असे मृत मुलाचे नाव असून तो ‘दोस्ती प्लाझा’मध्ये कुटुंबासह राहत होता. शनिवारी सायंकाळी अब्दुल आणि त्याचा पाच मोठा भाऊ ‘दोस्ती प्लाझा’च्या आवारासमोर चालत होते. त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाची कॅब इमारतीचा गेटमधून आत आली. अब्दुलचा मोठा भाऊ लगेच बाजूला झाला. पण, अब्दुल बाजूला होता आले नाही. कॅब चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून अब्दुलच्या छातीवरून चाक घालवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
अब्दुलचे काका जावेद पटेल यांनी लगेच त्याच कॅबमधून अब्दुलला साकीनाका येथील पॅरामाउंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कुटुंबीयांनी अब्दुलला घाईघाईने सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लॅमिनेशनचा व्यवसाय करणारे अब्दुलचे वडील अस्लम पटेल यांनी ‘कॅब’ चालकाविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे साकीनाका पोलिसांनी अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रिझवानला अटक केली आणि त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून दिले.