मुंबई : अंधेरी (पश्चिम) परिसरातील पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्याला अतिरिक्त जलमार्ग देण्यात येणार आहे. गिल्बर्ट हिल रोड जंक्शनपासून जे.पी. रोडच्या उत्तरेकडील बाजूने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत सुमारे १५० मीटर लांबीची आणि २ मीटर बाय २.५ मीटर आकाराची बॉक्स ड्रेन बांधण्यात येणार आहे. यासाठी २.८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या अतिरिक्त जलवाहिनीमुळे परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. के/पश्चिम विभागातील मोगरा नाल्याच्या भरडावाडी रोड कल्व्हर्टपासून जेपी रोडलगत डीएन नगर मेट्रो स्थानकाजवळील क्रिस्टल पॉइंट मॉलसमोरील मोगरा नाला लिंक रोड कल्व्हर्टपर्यंत नवीन पर्जन्य जलवाहिनीचे काम यापूर्वीच करण्यात आले आहे. या जलवाहिनीमुळे अंधेरी सबवे मार्गे पावसाचे पाणी मोगरा नाल्यात सोडले जाते.
मात्र, विद्यमान जलवाहिनीचे काम करताना आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली पियर क्रमांक ८३ ते ८५ दरम्यान मेट्रोच्या पायाचा वाढीव आकार, महानगर गॅसची पाइपलाइन आणि पाण्याच्या पाइपलाइन यांसारख्या अडथळ्यांमुळे सुमारे ६० मीटर अंतरात प्रस्तावित बॉक्स ड्रेनची रुंदी ३ मीटरवरून १ मीटरपर्यंत कमी करावी लागली. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
या समस्येवर उपाय म्हणून कंत्राटदाराने हायड्रॉलिक सल्लागाराची नियुक्ती केली. सल्लागाराने परिस्थितीचा अभ्यास करून आवश्यक जलवाहन क्षमता कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त २ बाय २.५ मीटर आकाराची बॉक्स ड्रेन उभारण्याची शिफारस केली. त्यानुसार गिल्बर्ट हिल रोड जंक्शनपासून जे.पी. रोडच्या उत्तरेकडील बाजूने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत सुमारे १५० मीटर लांबीचा अतिरिक्त जलमार्ग उभारण्यात येणार आहे. हा जलमार्ग आधीच बांधण्यात आलेल्या बॉक्स ड्रेनला जोडण्यात येणार आहे.
ए-नववेअर रिअल्टी यांनी अंदाजित दरापेक्षा २२.५० टक्के कमी दराची बोली लावली असून, मंजुला हॉल यांनी १९.१९ टक्के आणि पॉप्युलर एंटरप्राईजेस यांनी १८.८१६ टक्के बोली लावली आहे.