Mumbai : वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार; गरीबनगरमधील ९४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, पश्चिम रेल्वेचा दणका  
मुंबई

Mumbai : वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार; गरीबनगरमधील ९४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, पश्चिम रेल्वेचा दणका

वांद्रे टर्मिनसच्या प्रस्तावित विस्तार आणि एकात्मिक रेल्वे संकुलाच्या विकासातील मोठा अडथळा दूर करत, पश्चिम रेल्वेने शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमधील उर्वरित ९४ अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करत पाडली.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक

मुंबई : वांद्रे टर्मिनसच्या प्रस्तावित विस्तार आणि एकात्मिक रेल्वे संकुलाच्या विकासातील मोठा अडथळा दूर करत, पश्चिम रेल्वेने शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमधील उर्वरित ९४ अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करत पाडली. पाच जेसीबी आणि एका पोकलेन मशीनच्या सहाय्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांचे (जीआरपी) ५० हून अधिक जवान तसेच दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार, रहिवाशांना एका आठवड्यात जागा खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यानंतरच्या ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनाला ही बांधकामे पाडण्याची मुभा देण्यात आली होती. या आधी यंदाच्या १९ ते २१ मे दरम्यान राबवलेल्या मोठ्या कारवाईत रेल्वे जमिनीवरील सुमारे ५०० अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली होती; मात्र, तेव्हा ९४ बांधकामे तशीच ठेवली गेली होती. पात्र प्रकल्पबाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनासाठी ही घरे तात्पुरती राखण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता सर्व ९४ पात्र कुटुंबांना हक्काचे कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थान उपलब्ध करून देऊन ताबा दिला आहे. पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही धडक कारवाई केली. उच्च न्यायालयाने निकाली काढलेल्या एका रिट याचिकेच्या अनुषंगाने ही कारवाई पार पडली.

वांद्रे टर्मिनसची क्षमता वाढणार

सध्या दररोज सुमारे २२ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची या दळणवळण केंद्रातून ये-जा होते. जमीन मोकळी झाल्यामुळे वांद्रे टर्मिनसच्या बहुप्रतीक्षित पुनर्विकासाला मोठी गती मिळणार आहे. या मोकळ्या जमिनीवर टर्मिनसचा मोठा विस्तार करण्यात येणार असून, यामध्ये तीन अतिरिक्त फलाट आणि सहा स्टेबलिंग लाइन्सचा समावेश असणार आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास स्थानकाची कार्यक्षमता तब्बल ५० टक्क्यांनी वाढेल आणि मुंबईला प्रामुख्याने उत्तर भारताशी जोडणाऱ्या डझनभर नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे शक्य होईल.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा प्रस्ताव

पुनर्विकास आराखड्यात मोकळ्या जमिनीच्या दादरकडील बाजूस डिझेल लोकोमोटिव्ह मेंटेनन्स शेड आणि त्यास जोडणारा स्वतंत्र रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे तसेच टर्मिनसच्या पूर्व बाजूला प्रवाशांसाठी प्रशस्त हॉल्डिंग एरिया, फिरण्यासाठी मोकळी जागा, स्थानक सुविधा आणि पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू आहे. उपनगरीय वांद्रे स्थानक आणि वांद्रे टर्मिनस यांच्यात उत्तम समन्वय साधत प्रवाशांना लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सहज बदल करता यावा, यासाठी रेल्वे नियोजन करत आहे.

स्वतंत्र रिक्षा आणि टॅक्सी लेन

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि राज्य सरकारच्या सहकार्याने प्रवाशांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था सुटसुटीत करण्यासाठी स्वतंत्र रिक्षा आणि टॅक्सी लेनदेखील प्रस्तावित सुधारणांचा एक भाग आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : तयार फराळाला महागाईची फोडणी; दरांमध्ये झाली ३० ते ४० टक्क्यांनी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री

इंडिया आघाडीचा ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आज

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी चालक, ब्लॉगरला रुग्णालयातून डिस्चार्ज

FDA तील चार अधिकारी निलंबित; कारवाई करताना अनियमितता, २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय