मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरात पुनर्विकास प्रकल्पाला अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळवून देण्यासाठी रस्त्यांची प्रत्यक्ष रुंदी आणि महापालिकेच्या अभिलेखांतील रुंदी यामध्ये तफावत ठेवून चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने एच-पश्चिम विभागातील सहाय्यक अभियंता दीपक घोलम यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी त्यांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांच्या वेतनातून ५० हजारांच्या दोन मासिक हप्त्यांत ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. २० नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली होती. बांद्रा पश्चिम येथील बोरान रोड व गावठाण रोड परिसरातील तीन भूखंडांलगत असलेल्या रस्त्यांची रुंदी राजकीय वरदहस्तातून महापालिकेच्या नोंदींमध्ये प्रत्यक्षापेक्षा अधिक दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या चुकीच्या नोंदींच्या आधारे विकासकांना पुनर्विकासात अतिरिक्त एफएसआयचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
रस्त्यांच्या रुंदीचा एफएसआयशी थेट संबंध
इमारतीची अनुमत उंची, एफएसआय आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार पुनर्विकासाची पात्रता निश्चित करताना रस्त्यांची रुंदी महत्त्वाची ठरते. त्यामुळे रस्त्यांची रुंदी प्रत्यक्षापेक्षा अधिक दाखवल्यास विकासकांना अतिरिक्त बांधकामाची परवानगी मिळण्याची शक्यता असते. तसेच अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीनेही रस्त्यांची किमान रुंदी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील तरतुदींच्या अनुषंगानेही या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांच्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दीपक घोलम यांनी बोरान रोडलगतच्या तीन भूखंडांशी संबंधित रस्त्यांच्या रुंदीबाबत चुकीचे मत नोंदवले होते. हे कृत्य मुंबई महापालिका सेवा (वर्तणूक) नियम १९९९ मधील नियम ३(१)(i) आणि ३(१)(ii) चे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाले.
गावठाण लेनची रुंदी
तक्रारीनंतर एच-पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्विकास प्रस्तावांमध्ये नमूद केलेली रस्त्यांची रुंदी आणि प्रत्यक्ष मोजमाप यामध्ये मोठी तफावत आढळली. पुनर्विकास प्रस्तावात गावठाण रोडची रुंदी सहा मीटर, तर बोरान रोडची रुंदी नऊ मीटर दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत गावठाण रोडची रुंदी अवघी ४.४ मीटर आणि बोरान रोडची रुंदी ७.४ मीटर असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या ८ जुलै २०१४ च्या जुन्या अभिलेखातही गावठाण लेनची रुंदी ३.८ ते पाच मीटरदरम्यान नोंदवण्यात आली होती.
दोन महिन्यांत पगारातून दंड वसूल करणार
पश्चिम उपनगराचे उपायुक्त (परिमंडळ-३) यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित अभियंत्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विभागीय स्तरावर संक्षिप्त चौकशी सुरू करण्यात आली.
९ जानेवारी २०२६ रोजी दीपक घोलम यांना आरोपपत्र बजावण्यात आले. मात्र, आपली बाजू मांडण्याची संधी देऊनही त्यांनी आरोपपत्राला कोणतेही उत्तर सादर केले नाही. पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेने त्यांच्या वेतनातून एक लाख दंडाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दोन मासिक हप्त्यांत ही वसुली केली जाणार आहे.