Mumbai : समुद्र किनारी स्वच्छता मोहीम; १० दिवसांत अडीच हजार टन कचऱ्याची विल्हेवाट X | @richapintoi
मुंबई

Mumbai : समुद्र किनारी स्वच्छता मोहीम; १० दिवसांत अडीच हजार टन कचऱ्याची विल्हेवाट

मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ९ ते १९ जुलै या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ९ ते १९ जुलै या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

विशेष म्हणजे १४ ते १८ जुलै या कालावधीत समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटांसह मोठी भरती होती. यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा असे एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. स्वच्छता कामांचे नियमित नियोजन, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा तत्काळ हटविण्यासाठी यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळाची प्रभावी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. या व्यापक स्वच्छता उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.

उपायुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किरण दिघावकर यांनी चौपाटीवरील कचरा संकलनाबाबत सांगितले की, “९ ते १९ जुलै या कालावधीत १.१ किलोमीटर लांबीच्‍या गिरगाव चौपाटी (डी. विभाग) येथून ३३.६६ मेट्रिक टन, ५ किलोमीटर लांबीच्‍या दादर-माहीम समुद्रकिनारा (जी. उत्तर विभाग) येथून १५२.१० मेट्रिक टन, ३.५ किलोमीटर लांबीच्‍या चिंबई-वारिंगपाडा समुद्रकिनारा (एच. पश्चिम विभाग) येथून १२७.२० मेट्रिक टन, ८ किलोमीटर लांबीच्‍या मढ-मार्वे समुद्रकिनारा (पी. उत्तर विभाग) येथून ४४. २८ मेट्रिक टन, ६ किलोमीटर लांबीच्‍या जुहू समुद्रकिनारा (के. पश्चिम विभाग) येथून १,८२५ मेट्रिक टन, ४.५ किलोमीटर लांबीच्‍या वेसावे समुद्रकिनारा येथून २७७.६० मेट्रिक टन तसेच सरासरी ७ किलोमीटर लांबीच्‍या गोराई समुद्रकिनारा (आर. मध्य विभाग) येथून ३८.८२ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

विशेष पथके कार्यरत

विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने तो तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचऱ्याचे संकलन व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे कार्य करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ‘शताब्दी’ला एनएबीएच मानांकन; पालिकेचे पहिले सामान्य रुग्णालय ठरले

Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची तक्रार; जनरलच्या डब्यात 'पार्सल'वाल्यांची घुसखोरी

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका