BEST चा १,३१७ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर; ५ हजार गाड्या येण्यावर उत्पन्नवाढीचे नियोजन; पुरवठ्याच्या विलंबावरून सदस्यांचा प्रशासनाला जाब 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

BEST चा १,३१७ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर; ५ हजार गाड्या येण्यावर उत्पन्नवाढीचे नियोजन; पुरवठ्याच्या विलंबावरून सदस्यांचा प्रशासनाला जाब

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आगामी आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असली, तरी या अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे गणितच आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल १ हजार ३१७ कोटी ५० लाख रुपयांची तूट असलेल्या अर्थसंकल्पास बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आगामी आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असली, तरी या अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे गणितच आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल १ हजार ३१७ कोटी ५० लाख रुपयांची तूट असलेल्या अर्थसंकल्पास बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

भविष्यात उपलब्ध होणाऱ्या बसगाड्यांच्या आधारे उत्पन्नवाढीचे स्वप्न रंगवण्यात आले आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षातच अपेक्षित बसगाड्यांचा पुरवठा करण्यात प्रशासनाला अपयश आले असताना आगामी वर्षात हजारो बसगाड्या ताफ्यात दाखल होतील, या अपेक्षेवर अर्थसंकल्पाची उभारणी कितपत व्यवहार्य आहे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी तर या अर्थसंकल्पाला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे संबोधत प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर खरमरीत टीका केली.

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांची जुळवाजुळव असल्याची टीका गणाचार्य यांनी केली. अर्थसंकल्पाचे महापालिका लेखापरीक्षण झालेले नसताना त्यातील उत्पन्नाचे अंदाज कितपत विश्वासार्ह मानायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भविष्यात मोठ्या प्रमाणावर बसगाड्या उपलब्ध होतील आणि त्यातून प्रवासी संख्या वाढून तिकीट विक्रीचे उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र, कागदावरील बसगाड्या आणि रस्त्यावर धावणाऱ्या बसगाड्या यांतील फरक प्रशासनाने लक्षात घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

गाड्या वेळेत ताफ्यात दाखल होतील का?

चालू वर्षात सुमारे तीन हजार बसगाड्या उपलब्ध होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात सुमारे ६०० बसगाड्यांची तूट राहिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. असे असताना पुढील आर्थिक वर्षात आणखी पाच हजार बसगाड्या उपलब्ध होतील, असे गृहीत धरून उत्पन्नाचे नियोजन करण्यात आले आहे. आधीच्या पुरवठ्यातील विलंबाचा अनुभव लक्षात घेता एवढ्या मोठ्या संख्येने बसगाड्या वेळेत ताफ्यात दाखल होतील का, असा सवाल त्यांनी केला.

बसच नसतील तर प्रवासी कुठून वाढणार?

बेस्टच्या उत्पन्नवाढीचे प्रमुख गणित प्रवासी संख्या आणि तिकीट विक्रीवर अवलंबून आहे. मात्र, बसगाड्याच वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत, तर प्रवासी संख्या कशी वाढणार आणि अपेक्षित महसूल कसा मिळणार, हा कळीचा प्रश्न आहे. केवळ भविष्यातील अपेक्षांवर आधारित उत्पन्नाचे आकडे फुगवून अर्थसंकल्प तयार करणे योग्य नाही. उपलब्ध बसगाड्या, मनुष्यबळ, परिचालन खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न यांचा ताळमेळ घालून वास्तववादी आर्थिक नियोजन करण्याची गरज असल्याचे गणाचार्य यांनी स्पष्ट केले.

कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

बसगाड्यांच्या पुरवठ्याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी उत्तर दिले. वेटलिस्टमधील कंपन्यांसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार बसगाड्यांचा पुरवठा निश्चित मुदतीत करणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत बसगाड्या उपलब्ध न केल्यास करारातील अटींनुसार संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिला.

यावर गोष्टींवर भर द्यावा!

खारघर, पनवेलमध्ये बेस्टची बससेवा सुरू करण्यात यावी. नाशिक कुंभमेळा, अयोध्या, काशी विश्वनाथ, उज्जैन यासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात यावी. २०१२ च्या भरती धोरणात बदल करून नवीन कर्मचाऱ्यांनाही संधी देण्यात यावी. पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता हाच निकष न ठेवता इतर बाबींचाही विचार करावा. बेस्टने शून्य अपघातांचे उद्दिष्टा ठेवावे,.चालकांचे प्रशिक्षण कडक करावे, गाड्यांचा दर्जा जागतिक स्तराचा असावा, अशा सूचना सदस्य रमाकांत गुप्ता यांनी केल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?