मुंबई : मद्यप्राशन केलेल्या एका व्यक्तीच्या भरधाव व्हॅनने दादर येथे बेस्ट बस आणि इतर दोन वाहनांना धडक दिल्याने एक जण ठार झाला. तर सहा जण जखमी झाले.
२७ वर्षीय व्हॅनचालक संजय धोंडू कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे. तो अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बेस्टची वेट-लीज बस वरळी बस डेपोहून प्रतीक्षा नगरकडे जात असताना ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
बस दादर प्लाझा स्टॉपवर पोहोचताच शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने बसच्या उजव्या बाजूला धडक दिली. ती डाव्या बाजूला वळली आणि बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना धडकली. या घटनेत बसचे नुकसान झाले. त्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने एका टॅक्सी आणि दुसऱ्या एका पर्यटक कारलाही धडक दिली. यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले. सायन रुग्णालयात डॉक्टरांनी शहाबुद्दीन शेख (३७) याला मृत घोषित केले. सहा जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.