मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाइफलाईन असलेल्या बेस्टची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. तरी बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील बसगाड्यांवर काम करणारे कंत्राटी कर्मचारी समान काम, समान वेतन आणि इतर सेवासुविधांबाबत संप करण्याच्या तयारीत आहेत. संप करावा की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या माध्यमांतून मतदान प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवारपासून मुंबईतील पाच आगारांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस, कामगार नेते शशांक राव यांनी दिली.
बेस्ट उपक्रम हा गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात आहे. बेस्ट उपक्रमाकडे आपल्या कायम कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी देणे यासाठी पैशांची चणचण आहे. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाला तोट्यामधून नफ्यात आणण्यासाठी २०१९ पासून बेस्ट परिवहन खात्यात भाडे तत्वावरील बसगाड्या चालविण्यासाठी घेण्यात आल्या आहेत. मात्र तरीही बेस्ट उपक्रम तोट्यामधून अद्यापही बाहेर आलेला नाही.
बेस्ट उपक्रमाने ९ जून पासून शासनाच्या मान्यतेने तिकीट दरवाढ केली. मात्र त्यामुळे उत्पन्नात जरी भर पडली असली तरी प्रवाशांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. अशातच आता भाडे तत्त्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या चालक व वाहक यांनी, संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बेस्टच्या बस आगारात मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड व मुंबई सेंट्रल या पाच आगारांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत मतदान घेण्यात आले. उर्वरित आगारांमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा २२ जुलै रोजी पार पडणार आहे.