मुंबईत सोमवारी (दि.२९) रात्री भांडूप रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. गजबजलेल्या स्टेशन रोड परिसरात बेस्ट बसने १३ नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे, अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात रस्त्याच्या कडेला रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना अनियंत्रित बस अचानक धडकल्याचे दिसत आहे, यानंतर एकच धावपळ उडाली होती.
चुकून ब्रेकऐवजी एक्सीलरेटर दाबला?
प्राथमिक माहितीनुसार, रात्री १० वाजून ५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. बेस्टची इलेक्ट्रिक बस रिव्हर्स घेताना अनियंत्रित झाली. अंतिम थांब्यावर बस रिव्हर्स घेत असताना चालकाचा ताबा सुटून बसने नागरिकांना धडक दिली. काही रिपोर्ट्समध्ये ५२ वर्षीय चालक बाजूच्या बस डेपोमध्ये जाण्यासाठी यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने चुकून ब्रेकऐवजी एक्सीलरेटर दाबला आणि बस प्रवाशांच्या रांगेत घुसली, असेही नमूद आहे.
फेरीवाल्यांमुळे बेस्ट चालकांची तारेवरची कसरत
अनेक स्थानिकांनी अपघातासाठी अनधिकृत फेरीवाल्यांनाही जबाबदार धरले आहे. भांडूप स्थानकालगतच्या पादचारी मार्गावर सर्वत्र अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आधीच अरुंद रस्ता आणि आणइ फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे येथून बस चालविताना चालकांनाही तारेवरची कसरत करावी लागते. संध्याकाळच्या वेळी फेरीवाले आणि प्रचंड गर्दीमुळे भांडुप स्टेशनवर आपला प्रवास संपवणाऱ्या बसेसना रेल्वे स्टेशनबाहेर यू-टर्न घेण्यासाठी खूप त्रास होतो, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
चालक ताब्यात, चौकशी सुरू
एका बेस्ट प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलित असलेली ही नऊ मीटर लांबीची ओलेक्ट्रा बस भाडेतत्वावर चालवली जात होती आणि ती नगरदास नगर ते भांडुप स्टेशन दरम्यानच्या ६०६ रिंग रोड मार्गावर धावत होती. अपघाताच्या वेळी, बेस्टचे कर्मचारी असलेले संतोष रमेश सावंत (५२) हे बस चालवत होते, तर भगवान भाऊ घरे (४७) वाहक म्हणून कर्तव्यावर होते. अपघातानंतर बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघात कसा झाला याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
व्हायरल CCTV -
दरम्यान, गेल्या वर्षी कुर्ला येथील बेस्ट अपघाताच्या आठवणी या अपघातामुळे ताज्या झाल्या. त्यावेळी बेस्ट बसने अनेक पादचारी व २२ वाहनांना उडवले होते. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४२ जण जखमी झाले होते.