मुंबई : ग्रँट रोड येथील भाटिया रुग्णालयाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. दुपारी सुमारे १.३५ वाजण्याच्या सुमाराला रुग्णालयाच्या एका विभागात वायरिंगमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धुरामुळे रुग्णांना कोणताही अपाय होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
भाटिया रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले.
आगीमुळे रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यावेळी अग्निशमन दलासोबतच पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ आपत्कालीन कार्यपद्धती राबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
उपकरणांचे नुकसान
प्राथमिक अंदाजानुसार वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे काही उपकरणांचे नुकसान झाले असले तरी रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.