मुंबई : मुंबईतील जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा अधिक गंभीर झाला असून आणखी वीस हजार जन्म प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे ८७ हजार ३४७ खोटी जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप मुंबई महापालिकेवर झाला होता. त्यानंतर व्यापक प्रमाणपत्र पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या पडताळणीत १९ हजार ७३४ जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले असताना बुधवारी आणखी २० हजार जन्म प्रमाणपत्रात त्रुटी आढळून आल्या.
आरोग्य सेवा आयुक्तालयाने मूळ जन्म नोंद मूळ स्वरुपात ठेवून १९ हजार ७३४ नोंद दुरुस्ती रद्द करण्याची परवानगी महापालिकेला दिली आहे. तर आता आणखी २० हजार जन्म प्रमाणपत्रात त्रुटी आढळल्या असून मायनर त्रुटी मुंबई महापालिका स्तरावर दूर करणार असून मेजर त्रुटी राज्य सरकारच्या नियमानुसार कशा प्रकारे रद्द करण्यात येतील, यावर काम करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या २६ वॉर्डमधून एकूण ८७,३४७ अवैध जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणात बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महापौर, महापालिका आयुक्तांनीही याची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ई-वॉर्ड, एल-वॉर्ड, भायखळा, गोवंडी आणि देवनार परिसरात मोठ्या प्रमाणावर अशी प्रमाणपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले.
४८ तासात अहवाल द्या
या प्रकरणात एस आय टी स्थापन झाली असून चार ते पाच एफ आय आर दाखल झाले असून एफ आय आर वर काम करुन ४८ तासांत अहवाल सादर करा, असे निर्देश दिल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
तपासणी मोहिमेमध्ये, जन्म प्रमाणपत्रासाठी लागणारे आधार कार्ड, डोमिसाईल आदी महत्त्वाची लागणारी कागदपत्रेच अर्जासोबत जोडलेली नाहीत असे आढळून आले. त्यामुळे या कागदपत्रांशिवाय ही प्रमाणपत्रे तयार झालीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता.