मुंबई : मुंबईतील विकासकामांसाठी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. पवई येथील बंद पडलेल्या मलनिस्सारण पंपिंग स्टेशनच्या जागेवर ८ एमएलडी क्षमतेचे स्वयंचलित मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ४९ झाडे तोडण्याचा, तर ५२ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे भांडुप-नाहूर येथील आरबीआय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी ४० झाडे तोडण्याचे आणि ४८ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. या दोन प्रस्तावांमुळे एकूण ८९ झाडे तोडली जाणार असून १०० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, या कामांत अडथळा ठरणारी झाडे कापून त्यांचे अन्य सुरक्षित ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक नोटिशीनुसार, एस विभागातील या दोन्ही नियोजित प्रकल्पांच्या जागेवर एकूण ४१० झाडे अस्तित्वात आहेत. त्यापैकी १८९ झाडे विविध विकासकामांमुळे थेट प्रभावित होणार आहेत.
काही झाडे मृत, एक झाड पडलेले
पवई येथील बंद पडलेल्या मलनिस्सारण पंपिंग स्टेशनच्या जागेवर ८ एमएलडी क्षमतेचे पूर्णपणे स्वयंचलित मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ४९ झाडे तोडण्याचे आणि ५२ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी एकूण २५२ झाडे अस्तित्वात आहेत. नोटिशीत १०१ झाडे प्रभावित होणार असल्याची नोंद असून त्यापैकी काही झाडे मृत आणि एक झाड उन्मळून पडलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भांडुपमध्ये ८८ झाडे प्रभावित
भांडुप-नाहूर येथील सीटीएस क्रमांक ५३४ आणि ५४० या भूखंडांवर आरबीआयच्या वसाहतीचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. या कामासाठी ४० झाडे तोडण्याचे, तर ४८ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी सध्या १५८ झाडे असून त्यापैकी ८८ झाडांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार आहे. या प्रस्तावासाठी व्ही.के.ए. आर्किटेक्चर एलएलपी या संस्थेने अर्ज केला आहे.
सात दिवसांत हरकती, सूचना नोंदवा
या दोन्ही प्रस्तावांबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत विहित नमुन्यात किंवा dysg.ta@mcgm.gov.in या ई-मेलवर हरकती नोंदविता येतील. या प्रस्तावांवरील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० ते ५ वाजेपर्यंत महापालिकेच्या उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी कार्यालयात होणार आहे.