Mumbai : ९,५०० हायड्रंट बिनकामाचे; तांत्रिक ऑडिट करून आराखडा तयार करा, नगरसेवकाचे पालिका आयुक्तांना पत्र 
मुंबई

Mumbai : ९,५०० हायड्रंट बिनकामाचे; तांत्रिक ऑडिट करून आराखडा तयार करा, नगरसेवकाचे पालिका आयुक्तांना पत्र

दाटीवाटीने वसलेल्या मुंबईत वारंवार लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हायड्रंट महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईत १०,४४७ हायडूंट असून त्यापैकी ९,५०० हायड्रेट बिनकामाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : दाटीवाटीने वसलेल्या मुंबईत वारंवार लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हायड्रंट महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईत १०,४४७ हायडूंट असून त्यापैकी ९,५०० हायड्रेट बिनकामाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबईतील हायड्रंटचे तांत्रिक ऑडिट करून आराखडा तयार करा, याकडे भाजपचे नगरसेवक डॉ. नितेश सिंह यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक हायड्रंटचे सर्वेक्षण करुन तातडीने दुरुस्त करण्यात यावे, असे पत्र पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिल्याचे डॉ. नितेश सिंह यांनी सांगितले.

मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या महानगरात आगीच्या दुर्घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन हायड्रंट व्यवस्था अत्यंत चिंताजनक आहे. मुंबईत उंच इमारती, झोपडपट्ट्या, बाजारपेठा, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक क्षेत्रांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाला तातडीने आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक

असते. मात्र, अनेक ठिकाणी फायर हायड्रंट नादुरुस्त, बंद अथवा वापरण्यायोग्य नसल्यास अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही बाब केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय नसून मुंबईकरांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले.

काही महत्त्वाचे प्रश्न

फायर हायड्रंटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी किती आर्थिक तरतूद केली जाते, किती निधी प्रत्यक्ष खर्च होतो, स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्षमता तपासणी करूनच कंत्राटदारांची देयके अदा केली जातात का, असे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

सविस्तर माहिती द्या!

हायड्रंटची विभागनिहाय व वॉर्डनिहाय अधिकृत संख्या, प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या हायड्रंटची स्थिती, बंद अथवा नादुरुस्त हायड्रंटची कारणे, मागील पाच वर्षांतील दुरुस्तीचा खर्च, मंजूर निधी आणि प्रत्यक्ष खर्च, संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी तसेच देखभाल-दुरुस्ती कोणत्या विभागाकडे आहे, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी मागवली आहे.

जीपीएस आधारित डिजिटल मॅपिंग

मुंबईतील हायड्रंटची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करणे, प्रत्येक हायड्रंटचे जीपीएस आधारित डिजिटल मॅपिंग करणे, प्रत्यक्ष पाणीपुरवठा व दाबाची तपासणी करणे, नादुरुस्तांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

फायर हायड्रेट व्यवस्था कार्यरत नसल्यास अग्निशमन दलाला पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जंबो वॉटर टँकरची संख्या, त्यांची पाणी साठवण क्षमता, पर्यायी पाणीपुरवठा केंद्रांची उपलब्धता, त्यांची कार्यक्षमता आणि वार्षिक देखभाल खर्च याबाबतही प्रशासनाकडून सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

भारताच्या GDP वाढीची प्रशंसा; डोनाल्ड ट्रम्प यांची फेडरल रिझर्व्हवर टीका

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

नीट पेपरफुटीप्रकरणी बुधवारपासून सुनावणी

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार