मुंबई : जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्रासाठी वाया जाणारा वेळ आणि धावपळ आता कमी होणार आहे. नव्याने नोंदणी केलेल्या जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र पालिकेच्या कार्यालयीन दिवसांत तीन दिवसांत कधीही मिळणार आहे. तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्तीसाठी २५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मुंबई पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जुन्या प्रमाणपत्राचे क्यूआर कोडमध्ये रुपांतर करता येणार आहे. जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करणे, बाळाच्या जन्म प्रमाणपत्रातील आई-वडील यांच्या नावात दुरुस्ती, मूळ व तात्पुरता पत्त्यात दुरुस्ती, तारीख चूक दुरुस्ती, लिंग चूक दुरूस्ती आदीसारख्या दुरुस्तीसाठीचे अर्ज करता येणे शक्य झाले आहे.
नागरिकांनी या अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी विविध प्रकारच्या अर्ज प्रक्रियेबाबत माहितीपर फलक लावण्यात येत आहेत. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी अर्ज स्थितीच्या माहितीबाबत ‘युनिक आयडी’च्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करता येईल. अर्जासोबतच्या पोचपावतीवर युनिक आयडी नमूद करण्यात आला आहे.
नागरीकांना जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रातील दुरूस्तीच्या अनुषंगाने पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज स्वीकृतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणीच अर्जस्थिती जाणून घेता येईल. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेत भर पडणार आहे. या सेवेच्या निमित्ताने व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. विविध अर्जांच्या अनुषंगाने कार्यवाहीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.