भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष 
मुंबई

भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष

मुंबई महापालिकेच्या सभागृहात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधकांमधील सातत्याने वाढत चाललेले संघर्ष, तसेच महापौर रितू तावडे यांच्यावर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधकांमधील सातत्याने वाढत चाललेले संघर्ष, तसेच महापौर रितू तावडे यांच्यावर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोमवारी दादर येथील वसंत स्मृती येथे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी होणार असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगली आहे. एस आय आर हा बैठकीतील प्रमुख मुद्दा असला तरी सभागृहात ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, त्यामुळे साटम यांनी भाजपच्या नगरसेवकांना हजर राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून विकासकामे, पारदर्शक कारभार आणि शिस्तबद्ध प्रशासनाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सभागृहात सातत्याने होणारे वाद, एकमेकांवर होणारी टीका, तसेच महापौरांभोवती निर्माण झालेले वाद यामुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळत असल्याची भावना वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. विरोधकांकडून प्रत्येक बैठकीत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात असताना काही भाजप नगरसेवकांकडूनही ठोस भूमिका घेतली जात असल्याची नाराजी पक्षश्रेष्ठींना आहे.

शिस्तीचा, पक्षनिष्ठेचा धडा देणार

विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांच्या कामकाजावरून विरोधक सातत्याने आक्रमक होत आहेत. सभागृहाचे संचालन, विविध निर्णय आणि प्रशासनाशी असलेले संबंध या मुद्द्यांवरून महापौरांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याला उत्तर देताना सत्ताधारी सदस्य अनेकदा बचावात्मक भूमिका घेत असल्याने पक्षाची कोंडी होत असल्याचे समोर आले आहे तसेच भाजपमधील अंतर्गत मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा आहे. काही नगरसेवक स्वतंत्र भूमिका घेत असल्याने आणि माध्यमांमध्ये परस्परविरोधी विधाने करत असल्याने पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच अमित साटम यांनी ही बैठक बोलावून नगरसेवकांना शिस्तीचा आणि पक्षनिष्ठेचा धडा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आरोपांना उत्तर देण्याची रणनीती आखणार

सोमवारी होणाऱ्या बैठकीत सभागृहातील आक्रमक राजकारणाला कसे तोंड द्यायचे, विरोधकांच्या आरोपांना एकसंघपणे उत्तर कसे द्यायचे आणि पक्षाची प्रतिमा कशी उंचावायची याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे तसेच महापौरांवरील हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याबाबतही रणनीती आखली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग