मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २०१७ च्या निवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात तर २०१२ च्या निवडणुकीमुळे २९ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर २०२६-२७ चा अर्थसंकल्प महापौर व उपमहापौर निवडीच्या कचाट्यात सापडल्यामुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापौरपदाची व स्थायी समिती अध्यक्षाची निवड झाल्यानंतरच २०२६-२७ चा अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समितीला पालिका आयुक्त सादर करतील. दरम्यान, २०२५-२६ चा ७४ हजार ४१७.४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर यंदाच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार असून यंदाचा अर्थसंकल्प ८२ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
प्रशासक म्हणून त्या त्या आयुक्तांनी २०२३, २०२४ व २०२५ चा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष म्हणून स्वतःला सादर केला होता. मात्र यंदा मुंबई महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची लगबग सुरू आहे. परंतु अद्याप महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे स्थायी समितीची घोषणा झाल्यावर पालिका आयुक्त २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पालिकेच्या लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने मेहनत घेतली आहे. पालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज तयार असून स्थायी समितीला सादर करण्याची फक्त प्रतीक्षा आहे.