मुंबई महानगरपालिकेतील सभागृहाचे आगळे वेगळे महत्त्व असून महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाचे कामकाज चालते. तब्बल ९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. यात भाजप - शिंदे सेना, ठाकरे बंधू, काँग्रेस, एमआयएम पक्षांसह अन्य नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू होणार नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली आहे. साडेतीन वर्षांनंतर सभागृहात नगरसेवकांची रेलचेल असणार आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे, यासाठी सभागृहाची स्वच्छता, विद्युत रोषणाई, माईकची तपासणी करत सभागृहात चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली आणि ७ मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर ८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आले. गेली साडेतीन वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य होते.
२०२२ मध्ये निवडणुका न झाल्याने २०१७ पासून मुंबईची निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला.
यात भाजप-शिंदे सेना, ठाकरे बंधू, काँग्रेस, एमआयएम पक्षांसह अन्य नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला असून भाजप व शिंदे सेनेचे एकूण ११८ नगरसेवक निवडून आले आहेत तर ठाकरे बंधूंसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक असे ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस २४ तर एमआयएमचे ८ व अन्य १० नगरसेवक निवडून आले आहेत.
सभागृह सजले
मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्याने मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांची उठबस सुरू होणार आहे. सभागृह, स्थायी समिती, आरोग्य समिती, विधी समिती अशा विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. यामध्ये निवडून आलेले २२७ नगरसेवक आणि नामनिर्देशित १० नगरसेवक सभागृहाच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. तब्बल साडेतीन वर्षांनंतर सभागृह, स्थायी समितीसह अन्य समित्यांचे कामकाज पार पडणार असल्याने सभागृहातील स्वच्छता, विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम याची योग्य ती काळजी घेत सगळ एकदम परफेक्ट करण्यात आले आहे.
नगरसेवकांची संख्या अशी वाढत गेली
'म्युनिसिपल कॉरपोरेशन ऑफ द सिटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेची स्थापना करताना ६४ नगरसेवक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या ६४ नगरसेवकांपैकी ३६ नगरसेवक निवडणुकीतून आले होते तर उर्वरित सदस्यांची नियुक्ती सरकार आणि पदवीधर प्रतिनिधींमधून करण्यात आली होती. त्यानंतर नगरसेवकांची संख्या ६४ वरून ७२ करण्यात आली. १९९२ मध्ये पालिकेत तिसरा मोठा बदल झाला आणि नगरसेवकांची संख्या ७२ वरून १०६ करण्यात आली. त्यानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने प्रभागरचना बदलून नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली. २०१७ च्या निवडणुकीत ही संख्या २२७ होती. सद्यस्थितीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या २२७ इतकीच आहे.
सभागृहाची ४ सप्टेंबर १८७३ ला पहिली बैठक
बॉम्बे म्युनिसिपल कॉरपोरेशनच्या आमसभेची पहिली बैठक ४ सप्टेंबर १८७३ रोजी पार पडली होती. ही ऐतिहासिक बैठक पेटिट स्ट्रीट येथे घेण्यात आली होती. पुढे १८९३ मध्ये मनपा मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सभागृहात नियमित बैठका सुरू झाल्या.