मुंबई महापालिका  
मुंबई

लोकप्रतिनिधींशिवाय श्रीमंत महापालिकेचा विकासकामांचा धडाका

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका यंदा राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकीय राजवटीखाली जवळपास चार वर्षे पूर्ण करत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा दीर्घकाळ अभाव असतानाही, हा काळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निर्णायक ठरला आहे.

शेफाली परब-पंडित

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका यंदा राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकीय राजवटीखाली जवळपास चार वर्षे पूर्ण करत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा दीर्घकाळ अभाव असतानाही, हा काळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निर्णायक ठरला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेले व महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर २०२५ मध्ये पूर्णत्वास गेले, तर अनेक प्रकल्प अद्याप सुरू आहेत.

पूर्ण झालेले पूल…

  • १९६० च्या दशकात बांधलेला अंधेरीतील महत्त्वाचा पूर्व-पश्चिम दुवा असलेला गोखले पूल २०१८ मध्ये त्याचा एक भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जीर्ण घोषित करण्यात आला होता. जवळपास ३० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल ११ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, शेजारील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी झालेल्या मोठ्या विसंगतीमुळे (मिसअलाईनमेंट) त्याच्या उद्घाटनामुळे राष्ट्रीय स्तरावर नामुष्की ओढवली.

  • विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणारा पूल यावर्षी जूनमध्ये, काम सुरू झाल्यानंतर जवळपास सात वर्षांनी पूर्ण झाला. विशेष म्हणजे, हा सक्रिय रेल्वे रुळांवर उभारलेला ‘ओपन-वेब गर्डर’ प्रणाली असलेला भारतातील सर्वात लांब रेल्वे उड्डाणपूल आहे.

  • दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल जुलैमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ या पुलाचे नाव सिंदूर पूल असे ठेवण्यात आले. ३२८ मीटर लांबीचा हा पूल मोहम्मद अली रोड व सीएसएमटी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करतो. १५० वर्षे जुना पूल २०२२ मध्ये असुरक्षित ठरल्याने पाडण्यात आला होता व सुमारे ६० कोटी रुपये खर्चून नव्याने उभारण्यात आला. मात्र, उद्घाटनातील विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.

सुरू असलेले पूल…

  • मढ-वर्सोवा केबल-स्टे पूल प्रकल्पासाठी सर्व पर्यावरणीय परवानग्या मिळाल्यानंतर अखेर काम सुरू होणार आहे. १९६७ च्या विकास आराखड्यात प्रथम प्रस्तावित करण्यात आलेला हा पूल वर्सोवा खाडीवर मढ जेट्टी रोड ते मत्स्य विद्यापीठ रोडजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होईल आणि अंतर २० किमीवरून २.६ किमी होईल.

  • डिसेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या २६.३ किमी कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे ४५ हजार खारफुटी तोडावी लागू शकते. ४२ महिन्यांत पूर्ण होणाऱ्या या उंच मार्गामुळे प्रवासाचा वेळ ३०–४५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

पहिलीच गृहनिर्माण लॉटरी…

पहिल्यांदाच बीएमसीने शहरात ४२६ घरांसाठी गृहनिर्माण लॉटरी काढली असून, यातून सुमारे ३०८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. ५५ लाख ते १ कोटी रुपये दरम्यान किंमत असलेली ही घरे कांदिवली, भांडुप, भायखळा, कांजुरमार्ग, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथे आहेत. यापैकी ३८१ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) व ४५ घरे अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) राखीव आहेत. घरांची चटई क्षेत्रफळे २६९ ते ४८९ चौ. फूट इतकी आहेत.

टेकडीवरी पहिला निसर्ग मार्ग…

चार वर्षांनंतर एप्रिलमध्ये मलाबार हिल येथील शहराचा पहिला एलिव्हेटेड निसर्ग मार्ग खुला झाला. २५ कोटी रुपये खर्चाचा ४७० मीटर लांब व २.४ मीटर रुंद हा मार्ग एकावेळी ४०० लोक सामावू शकतो आणि गिरगाव चौपाटीचे मनोहारी दृश्य दिसते. लाकडी डेक, कठडे व उभ्या आधारस्तंभांसह हा मार्ग पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

मुंबईचे आठवे धरण…

पालघरमधील गारगाई नदीवरील धरण – मुंबईचे आठवे जलस्रोत – अखेर सुरू झाले. चर्चेत असलेला हा ३,०४० कोटींचा प्रकल्प दररोज ४५० दशलक्ष लिटर पाणी पुरवेल.

रस्ते काँक्रीटीकरण अर्ध्यावर…

२३ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या १७ हजार कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. जानेवारी २०२३ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प सध्या केवळ अर्धवट पूर्ण झाला असून, दोन टप्प्यांत २,१२१ रस्त्यांवरील एकूण ६९९.१० किमी कामाचे नियोजन आहे.

१७ वर्षांनंतर नवे होर्डिंग धोरण…

नोव्हेंबरमध्ये बीएमसीने ‘जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे–२०२५’ जाहीर केली. ४०×४० फूटांपेक्षा मोठ्या होर्डिंगवर बंदी, फुटपाथ व गच्च्यांवरील जाहिरातींवर निर्बंध आणि डिजिटल होर्डिंगसाठी प्रकाशमान मर्यादा घालण्यात आल्या. मे २०२४ मधील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर हे धोरण वेगाने लागू करण्यात आले.

BMC Budget 2026 : श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष

ठाकरे सेना, पवार गट की कॉंग्रेस? राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडीची शक्यता

तपासात सहकार्य करत नसल्याने शीतल तेजवानीला अटक; राज्य सरकारचा दावा; मुंढवाप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

२४ महिन्यांत संपादन न केल्यास, जमिनीचे आरक्षण आपोआप रद्द; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा

Mumbai : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा; भाजपची ४, शिंदे सेनेची २, तर ठाकरे सेनेची ३ नावे जाहीर