मुंबई : मुंबईत काय घडतंय, आपत्कालीन परिस्थितीवर व्हिडीओ वॉलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. परळ येथील मुंबई महापालिकेच्या सेंटर फॉर इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट याठिकाणी व्हिडीओ वॉल बसवण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध माहिती, हवामानविषयक इशारे, आपत्कालीन परिस्थितीतील समन्वय व शहरातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी सीआयडीएममधील व्हिडीओ वॉल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या यंत्रणेची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियंत्रण व निरीक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
असा होतो उपयोग
कॅमेऱ्यांच्या प्रक्षेपणासहित व्हिडीओ बॉलवर भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ, डॉपलर रडार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ, महापालिकेची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित नियंत्रण आणि समादेशन प्रणाली, पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत विविध ठिकाणी बसवलेले पंप यावर देखरेख ठेवणे, त्यांची सद्यस्थिती इत्यादी बाबींचे प्रक्षेपण एकाचवेळी व्हिडीओ वॉलवर उपलब्ध झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करणे शक्य होते.