मुंबई

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

अखेर भाजपला यावेळी यश मिळाले असून जवळपास २५ वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली आहे. आपला गड शाबूत ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Swapnil S

मुंबई : ठाकरेंचा अभेद्य गड समजली जाणारी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यात अखेर भाजपला यावेळी यश मिळाले असून जवळपास २५ वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली आहे. आपला गड शाबूत ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीला दिले जात आहे. शिवसेनेत फूट पाडून संपूर्ण पक्षच ठाकरेंच्या हातून काढून घेतल्यानंतर आता मुंबईचा ‘आर्थिक’ गडही हिसकावून घेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर राजकीयदृष्ट्या मात केली आहे.

भाजपप्रणीत महायुतीने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२७ पैकी तब्बल ११८ जागा जिंकत बाजी मारली आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या असून शिंदे गटाने २९ जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे गटाने ६५ जागा, मनसे ६, कॉग्रेस २४, राष्ट्रवादी (शप) १, राष्ट्रवादी (अप) ३ जागा जिंकल्या आहेत.

महायुतीच्या झंझावातामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवरील २५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अनेक ठिकाणी भाजपला कडवी झुंज दिली.

ठाकरेंच्या माजी महापौरांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांचा विजय

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ८७ मधील मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या महेश (कृष्णा) पारकर यांचा पराभव केला आहे. यापूर्वी २०१७ मध्येही महेश पारकर हे विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यावेळी अवघ्या ३४ मतांनी महाडेश्वरांनी विजय मिळवला होता.

ठाकरेंची शिवसेना मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला. हा लढा सध्या सुप्रीम कोर्टात अद्यापही सुरूच आहे. मात्र, मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत ठाकरे गटाला जवळपास दुप्पट जागा मिळाल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ठाकरे समर्थक मतांची एकजूट झाली, तरीही एकनाथ शिंदेंमुळे मराठी मतांचे काही प्रमाणात विभाजन झाल्याचे बोलले जात आहे. तरीही भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना ही मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. आकडेवारी पाहता मुंबईत ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपुढे सरस ठरल्याचे दिसत आहे.

ठाकरेंचा लालबाग-परळ बालेकिल्ला अभेद्य

लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला असून येथील ७ पैकी ६ प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. विजयी झालेल्यांमध्ये प्रभाग २००मध्ये शिवसेना (उबाठा) उर्मिला पांचाळ , प्रभाग २०१ समाजवादी पार्टीचे इरम सिद्दीकी, प्रभाग २०२ शिवसेना (उबाठा) श्रद्धा जाधव, प्रभाग २०३ शिवसेना (उबाठा) श्रद्धा पेडणेकर, प्रभाग २०४ शिवसेना (उबाठा) किरण तावडे, प्रभाग २०५ मनसेच्या सुप्रिया दळवी, प्रभाग २०६ शिवसेनेचे (उबाठा) सचिन पडवळ यांचा समावेश आहे.

मत विकासाला - फडणवीस

निवडणुकांत प्रामाणिकपणा आणि विकास हवा असल्याने जनतेने भाजपप्रणीत महायुतीला मतदान केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. भाजपने विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला. जनतेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक महापालिकांमध्ये आम्हाला विक्रमी जनादेश मिळाला असून यावरून जनतेला प्रामाणिकपणा आणि विकास हवा असल्याचे स्पष्ट होते, असे फडणवीस म्हणाले.

महायुतीला पाठिंबा - शिंदे

महायुतीने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मतदारांचे आभार मानले. हा निकाल राज्य सरकारच्या विकास अजेंड्याला दिलेला ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील आपले मार्गदर्शक दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन केल्यानंतर शिंदे म्हणाले की, ठाणे महापालिकेत शिवसेनेने ७१ जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीत मिळालेल्या ६७ जागांपेक्षा हा आकडा अधिक आहे.

सुशासनाला आशीर्वाद - मोदी

महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीत रालोआला विजय मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातील उत्साही जनतेने रालोआच्या सुशासनाला आशीर्वाद दिला आहे. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले.

हे जिंकले

  • हेमांगी वरळीकर

  • पूजा महाडेश्वर

  • यशवंत किल्लेदार

  • मिलिंद वैद्य

  • यशोधर फणसे

  • विशाखा राऊत

हे हरले

  • समाधान सरवणकर

  • प्रिया सरवणकर-गुरव

  • दीप्ती वायकर

  • कप्तान मलिक

  • प्रज्योती चंद्रकांत हंडोरे

  • अनिल कोकीळ

ठाणे मनपा

  • एकूण जागा -१३१

  • भाजप - २८

  • शिवसेना (शिंदे) - ७१

  • शिवसेना (उबाठा)-०८

  • राष्ट्रवादी (शप) - ११

  • राष्ट्रवादी (अप) - ०३

  • काँग्रेस - ०२

  • मनसे - ०१

  • अन्य -०५

कल्याण डोंबिवली मनपा -१२२

  • शिवसेना (शिंदे) - ५३

  • भाजप - ५०

  • शिवसेना (उबाठा) - ११

  • मनसे - ०५

  • काँग्रेस - ०२

  • राष्ट्रवादी काँग्रेस - ०१

उल्हासनगर मनपा एकूण जागा- ७८

  • शिवसेना (शिंदे) - ३६

  • भाजप - ३७

  • काँग्रेस - ०१

  • अन्य - ०४

पनवेल मनपा एकूण जागा-७८

  • भाजप - ५५

  • शेकाप - ०९

  • शिवसेना उबाठा - ०५

  • शिवसेना (शिंदे) - ०२

  • काँग्रेस - ०४

  • रा. काँग्रेस (अप) - ०२

  • अन्य - ०१

मुंबई मनपा एकूण जागा- २२७

  • भाजप - ८९

  • शिवसेना (शिंदे) - २९

  • उबाठा - ६५

  • मनसे - ०६

  • काँग्रेस - २४

  • राष्ट्रवादी (अप) - ०३

  • राष्ट्रवादी (शप) - ०१

  • अन्य - १०

नवी मुंबई मनपा एकूण जागा- १११

  • भाजप - ६५

  • शिवसेना (शिंदे) - ४३

  • उबाठा (ठाकरे) - ०२

  • मनसे - ०१

मिरा-भाईंदर मनपा एकूण जागा-९५

  • भाजप - ७८

  • काँग्रेस - १३

  • शिवसेना (शिंदे) - ०३

  • अन्य - ०१

वसई-विरार मनपा एकूण जागा-११५

  • बविआ - ६९

  • भाजप - ४४

  • शिवसेना - ०१

  • काँग्रेस - ०१

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही

महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा 'धुरळा'; मैदानापेक्षा सोशल मीडियावरच रंगला 'बॉस पॅटर्न'!