मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांमध्ये तब्बल १,००,३२७ मतदारांनी ‘NOTA’ (यापैकी कुणीही नाही) या पर्यायाची निवड केली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १५ जानेवारी रोजी शहरात एकूण ५४,७६,०४३ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी १.८३ टक्के मते NOTAला मिळाली. या तुलनेत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत केवळ ८७, ६२३ मते नोटाला मिळाली होती.
पश्चिम उपनगरांत NOTAचा सर्वाधिक प्रभाव
BMC निवडणुकीत एकूण मतदानाचा टक्का ५२.९४ इतका नोंदवण्यात आला. दहिसर ते वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये NOTA चा सर्वाधिक टक्का आणि संख्या नोंदवण्यात आली. या भागात ४७,९३६ मतदारांनी NOTA निवडले, जे त्या विभागातील एकूण मतदानाच्या १.९ टक्के आहे. विशेष म्हणजे, याच पट्ट्यात शहरातील सर्वाधिक मतदानाचा टक्काही दिसून आला. बोरीवलीतील प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक ६२.०४ टक्के मतदान झाले, तर त्या खालोखाल दहिसरमधील प्रभाग ४ मध्ये ६०.६७ टक्के मतदान झाले.
पूर्व उपनगरातील आकडे
भांडूप ते सायन या पूर्व उपनगरांमध्ये २९,१०१ मतदारांनी NOTAचा पर्याय निवडला, जो एकूण मतदानाच्या १.७ टक्के आहे. तर कोलाबा, माहीम आणि माटुंगा परिसरात २३,२९० 'नोटा' मते नोंदवली गेली, जी एकूण मतांच्या १.८ टक्के आहे.
भाजपचे विजयी उमेदवार मकरंद नार्वेकरांच्या प्रभागात सर्वाधिक वापर
दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक २२६ मध्ये NOTA चा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. या प्रभागात १,४०४ मतदारांनी NOTAचा पर्याय निवडला. येथे एकूण ५० टक्के मतदान झाले होते. एकूण २७,४४४ मतांपैकी NOTAचा टक्का ५.१ इतका आहे. विशेष म्हणजे, या प्रभागात भाजपचे विजयी उमेदवार मकरंद नार्वेकर यांना १८,०५८ मते मिळाली आहेत.
सर्वात जास्त NOTA मतांची नोंद
प्रभाग २२६ : NOTA मते १,४०४ (५.१ टक्के) एकूण मते २७,४४४
प्रभाग १०७ : NOTA मते १,१७९ (३.८ टक्के), एकूण मते ३१,१६९
प्रभाग १५ : NOTA मते १,१२२ (३.५ टक्के), एकूण मते ३१,७०१
प्रभाग ४६ : NOTA मते ९८० (४.८ टक्के), एकूण मते २०,४०३
प्रभाग २७ : NOTA मते ९४० (५.१ टक्के), एकूण मते १८,३३०
सर्वात कमी NOTA मतांची नोंद
प्रभाग १८५ : NOTA मते १३९ (०.७ टक्के)
प्रभाग १३५ : NOTA मते १३७ (०.६ टक्के)
प्रभाग १३६ : NOTA मते १२४ (०.६ टक्के)
प्रभाग १३८ : NOTA मते १२४ (०.५ टक्के)
प्रभाग १३४ : NOTA मते केवळ ७६ (०.३ टक्के)
या आकडेवारीमुळे शहरातील मतदारांमधील असमाधान आणि नाराजीचा सूर अधिक ठळकपणे समोर आला आहे.