मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तब्बल ९ वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र, घरात शौचालयाचा वापर, पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात इच्छुकांची धावपळ सुरू आहे.
अर्ज दाखल करताना लागणारी शपथपत्रे, स्वयंघोषित प्रमाणपत्रे तसेच पालिकेचे विविध ‘ना हरकत’ प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी संभाव्य उमेदवार पालिका कार्यालये, पोलीस मुख्यालय आणि वकिलांचे फेरे मारताना दिसत आहेत. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर घाई गडबड टाळता यावी, यासाठी कागदपत्रे आधीच पूर्ण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २००१ नंतर एकही अपत्य नसल्याचे शपथपत्र, मालमत्ता कर व पाणी बिल थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अशा विविध तपशिलांची पूर्तता करावी लागत आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी अनेक संभाव्य उमेदवार वकिलांची मदत घेत आहेत. अर्ज स्वीकारताना निवडणूक अधिकारी कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करतात. कागदपत्रे अपूर्ण असल्यास त्याची माहिती तत्काळ दिल्याने अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता कमी होत आहे.
अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उमेदवारांना एकूण १३ महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये नामांकन अर्ज, पक्षाचा ‘एबी फॉर्म’, अनामत रकमेची पावती, निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या बँक खात्याचे विवरणपत्र, मतदार यादीतील नावाचा पुरावा, जात व जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, मालमत्ता कर व पाणी बिल थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच पोलीस चरित्र प्रमाणपत्राचा समावेश आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी, बँक शिल्लक, स्थावर मालमत्ता आणि कुटुंबीयांची माहिती असलेले प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) सादर करणे बंधनकारक आहे.