Mumbai : अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा  X| mybmc
मुंबई

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम, विलेपार्ले आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या परिसरासह प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी बुलडोझर चालवण्यात आला.

Swapnil S

मुंबई : पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम, विलेपार्ले आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या परिसरासह प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी बुलडोझर चालवण्यात आला. महापालिकेच्या ‘के’ पश्चिम विभाग कार्यालयांतर्गत गेल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू असून अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम), विलेपार्ले रेल्वे स्थानक (पश्चिम), जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पश्चिम), विरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळे करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील सुमारे २०० पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने २७ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम

या अभियानांतर्गत विलेपार्ले परिसरातील २७ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अंधेरी पश्चिम स्थानक परिसर, विलेपार्ले पश्चिम स्थानक परिसर, जोगेश्वरी स्थानक परिसर, राम गणेश गडकरी मार्ग, विरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील सहा पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

पदपथ झाले मोकळे, वाहतूक कोंडीही कमी   

सह आयुक्त    डॉ. भाग्यश्री कापसे आणि ‘के’ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी स्थानक परिसरातील तसेच स्वामी विवेकानंद मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे झाले आहेत. यामुळे गर्दीच्या वेळेत पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. या कारवाईसाठी एक जेसीबी, एक डंपर, सातहून अधिक अधिकारी-कर्मचारी, १५ कामगार आणि पाचहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

मोहम्मद अली रोड भागात पालिका ॲक्शन मोडवर

अतिक्रमण मुक्त फुटपाथ अभियानांतर्गत बुधवारी मोहम्मद अली रोडवर पालिकेने धडक कारवाई केली. या कारवाईत फुटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा हाणला. तर बेकायदा वाहने पार्क करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

त्या अंतर्गत ‘बी’ विभागांतर्गत मोहम्मद अली रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २२ फेरीवाल्यांना हटविण्यात आले. तसेच पाच ओटे (ओटले), दोन अनधिकृत संरचना, चार खांब, एक जाहिरात फलक, तीन प्रोजेक्शन (बाहेर आलेले बांधकामांचे भाग) हटविण्यात आले. याशिवाय फुटपाथवर पार्क केलेल्या नऊ वाहनांवरही कारवाई करण्यात आली.

मोहम्मद अली रोड हा मुंबईतील अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असल्याने येथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अतिक्रमण हटविण्यासोबतच परिसरात विशेष स्वच्छता मोहीमही राबविली. रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांची साफसफाई करून परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईसाठी महापालिकेच्या विविध विभागांबरोबरच वाहतूक पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. फुटपाथवरील आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी स्वतंत्र कारवाई केली. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास मदत झाली.

‘पादचारी प्रथम’ अभियानाचा मुख्य उद्देश पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे मोहम्मद अली रोड परिसरातील फुटपाथ मोकळे झाले असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

चीनच्या ह्युमनॉइड रोबोट क्रांतीचे वास्तव

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गोकुळाष्टमीला घरी दही लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा