मुंबई : शहरातील ठिकठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथावरील अतिक्रमण हटवण्याचे काम मुंबई मनपाकडून सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत १९७ किमी पदपथ अतिक्रमणमुक्त केले असून १४५९ ठिकाणी बुलडोझर फिरला आहे. भांडुप (प.) रेल्वे स्थानक परिसरातील ९४ अनधिकृत स्टॉल्स हटवले आहेत.
'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी १३४ पदपथांचे काम हाती घेतले आहे. सुमारे १९७ किमी अंतर पदपथ अतिक्रमण मुक्त केले असून १४५९ ठिकाणी बुलडोझर फिरवण्यात आला. भांडुप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांवर दोन दिवसांत ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई केली असून पादचारी प्रथम अभियानांतर्गत पुढेही कार्यवाही सुरुच राहणार असल्याचा इशारा एस वार्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी पालिकेकडून 'पादचारी प्रथम' हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाबाबत प्रत्येक प्रशासकीय विभागाचा (वॉर्ड ऑफीस) आणि त्या विभागातील विविध खात्यांकडून सुरू असलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात येत आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले.
भांडुप रेल्वे स्थानकाबाहेरील मोठी पादचारी वर्दळ असलेल्या परिसरातील पदपथ अडथळामुक्त करण्यावर भर देण्यात आला. भांडुप परिसरात पहिल्या टप्प्यात १४ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या १४ पदपथांपैकी जवळपास ११ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन तर नियमानुसार कारवाई !
पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभमार्गक्रमणासाठी आहेत. पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने, स्टॉल्स, बांधकामे अथवा कोणतेही साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
पदपथांनी घेतला मोकळा श्वास !
या कारवाईमुळे भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या तसेच स्थानकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी पदपथावरील मार्ग मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेत होणारी वाहतूक व पादचारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भांडुप रेल्वे स्थानक परिसरातून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने नागरिकांना आता अडथळामुक्त पदपथ मिळणार आहे.
७० कामगार, १०० पोलीस तैनात
या कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार तसेच ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.