मुंबई : वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 'ग्रीन वॉक वे' साकारण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते मंत्रालय आणि वांद्रे कुर्ला संकुलात 'ग्रीन वॉक वे' संकल्पना राबवण्यात येणार आहे. 'ग्रीन वॉक वे' उन्हाळ्यात मुबईकरांना झाडांच्या सावलीत चालणे दिलासादायक ठरणार आहे.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून मुंबईकरांचा घामटा निघत आहे. वाढत्या उकाड्यामुळे अंगांची लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळेस तर घरातून बाहेर पडणे आरोग्यावर परिणाम होतो. त्यात काँक्रिकीकरणामुळे तापमानात अधिकच वाढ होत आहे. वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे तापदायक ठरते. त्यामुळे मुंबईकरांचा हीट वेव्हपासून बचाव करावा, या उद्देशाने चर्चगेट ते मंत्रालय आणि वांद्रे कुर्ला संकुलात 'ग्रीन वॉक वे' संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त प्रदीप गवळी यांनी सांगितले.
१. 'ग्रीन वॉक वे' उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. 'हीट वेव्ह'च्या तडाख्यातून सुटका मिळवण्यासाठी झाडांच्या दाट हिरवळीने नटलेले, सावलीदार आणि पर्यावरणपूरक पादचारी मार्ग तयार करण्यावर भर दिला जात आहे.
२. या 'ग्रीन वॉक वे 'मुळे रोजच्या धकाधकीत चालणाऱ्या मुंबईकरांना थंडावा मिळणार असून, पायपीट अधिक सुखद आणि सुरक्षित होईल. मार्गाच्या दोन्ही बाजूंना स्थानिक झाडांची लागवड, पाण्याची फवारणी व्यवस्था, बसण्याची सोय आणि पर्यावरणपूरक पायवाटा यांचा समावेश असेल. यामुळे केवळ उष्णतेपासून बचावच होणार नाही, तर शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदतच होणार आहे.
३. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास चालना मिळणार असून नागरिकांना चालण्याची सवय लागून आरोग्यदायी जीवनशैलीलाही प्रोत्साहन मिळेल. शहरी विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा हा प्रकल्प मुंबईच्या 'ग्रीन' भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे.