Mumbai : आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार; रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार; रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार

१६ मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय पदे असलेल्या वैद्यकीय अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि उपवैद्यकीय अधीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर आता सेवाज्येष्ठतेनुसारच नियुती केली जाणार आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : १६ मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय पदे असलेल्या वैद्यकीय अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि उपवैद्यकीय अधीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर आता सेवाज्येष्ठतेनुसारच नियुती केली जाणार आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये कनिष्ठ डॉक्टरांकडे या पदांचा प्रभारी कार्यभार सोपवून सेवाज्येष्ठतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्यानंतर या पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणण्यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील अनेक उपनगरीय रुग्णालयांमध्ये सध्या ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. नियमानुसार मोठी रुग्णालये वैद्यकीय अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली असतात, तर लहान रुग्णालयांचा कारभार मुख्य वैद्यकीय अधिकारी पाहतात. मात्र, या पदांवर नियुक्त्या करताना प्रस्थापित नियमांकडे दुर्लक्ष करून कनिष्ठ डॉक्टरांना संधी दिली जात असल्याच्या तक्रारी होत्या. याची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्तांनी सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वसमावेशक सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे निर्देश दिले.

शैक्षणिक पात्रता, अनुभवी डॉक्टरचाच विचार होणार रिक्त पदांचा अतिरिक्त किंवा प्रभारी कार्यभार सोपवताना सेवाज्येष्ठता यादीतील क्रमानुसारच डॉक्टरांची संमती घेतली जाईल.

केवळ सरकारी आणि महापालिका नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांचाच या पदांसाठी विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ज्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे आवश्यक पात्रता नाही, त्यांना तसे लेखी स्वरूपात कळवण्यास सांगण्यात आले आहे तसेच ज्यांना ही जबाबदारी स्वीकारायची नाही, त्यांनाही एका आठवड्याच्या आत लेखी नकार द्यावा लागणार आहे.

कामकाजात शिस्त येणार

उपायुक्तांच्या (सार्वजनिक आरोग्य) सूचनेनुसार पात्र वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संमती मिळवण्याची औपचारिक प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. वांद्रे येथील के. व्ही. भाभा रुग्णालयात ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व रुग्णालय प्रमुखांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची संमती किंवा नकार पत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत या संदर्भातील एकत्रित अहवाल सादर केला जाणार असून या प्रक्रियेला प्रशासनाने उच्च प्राथमिकता दिली आहे. या निर्णयामुळे उपनगरीय रुग्णालयांमधील प्रशासकीय उत्तरदायीत्व वाढून कामकाजात शिस्त येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Mumbai : आजपासून मिठी नदीतील गाळ उपसणार; अखेर कंत्राटदाराची नियुक्ती

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

विवाहित पुरुष आणि प्रौढ महिला यांचे लिव्ह-इन-रिलेशन हा गुन्हा नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा