मुंबई महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे जलजोडणी घेतलेल्या गॅरेज, हॉटेल्सची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात याबबात विशेष मोहीम राबवून अनधिकृत जलजोडण्या तोडण्याचे आदेश आजच मुंबई महापालिका प्रशासनाला देण्यात येतील. तसेच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पाणी चोरी करणाऱ्या चोरांबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार राजहंस सिंह यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुंबईतील अनधिकृत जलजोडण्यांचा प्रश्न उपस्थित केला. कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, कलिना, साकीनाका, मालवणी आदी परिसरातील वस्त्यांमध्ये अनेक अनधिकृत गॅरेजेसमध्ये वाहन धुण्याच्या व्यवसायासाठी अनधिकृत जलजोडण्यांच्या माध्यमातून पाण्याचा सर्रास वापर करण्यात येत आहे.
तर कुर्ला, साकीनाका आणि एलबीएस रोड परिसरातील २-३ मजली अनधिकृत हॉटेल्स, लॉजेस व व्यापारी गाळ्यांना देखील अनधिकृत जलजोडण्या देण्यात आल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने प्रामाणिकपणे कर व पाणीपट्टी भरणाऱ्या मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शासनाने व महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अशा सर्व अनधिकृत जलजोडण्या तत्काळ खंडित करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, “मुंबई शहरास सध्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा, विहार व तुलशी या सात जलस्रोतांमधून पाणी पुरवठा केला जातो. यापैकी भातसा, अपर वैतरणा ही धरणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून उर्वरित धरणे ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहेत. सद्यस्थितीत मुंबईमध्ये वेगाने होणारा पुनर्विकास, बहुमजली इमारतीचे बांधकाम, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.
राज्यमंत्र्यांच्या इमारतीला मिळेना पाणी
जून महिनाअखेरीस पावसाने पाठ फिरविल्याने मुंबईवर पाणी संकट अधिक गडद झाले आहे. मुंबई पालिकेने पाणी कपात लागू केल्यामुळे अनेक इमारतींना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. अशीच झळ राज्यमंत्री योगेश कदम यांच्या इमारतीला बसल्याचे सामंत म्हणाले.
९० दिवसांत मोहीम राबवणार
मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील कुर्ला, साकीनाका येथे एकूण १४, एम पूर्व विभागातील मानखुर्द, गोवंडी येथे एकूण २३, एच पूर्व विभागातील कलिना येथे एकूण ५ व पी उत्तर विभागातील मालवणी येथे एकूण ५ वाहन धुण्याच्या व्यवसायासाठी वापरत असलेल्या अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच ३० अनधिकृत गॅरेजच्या सामानाची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील ९० दिवसात ही मोहीम राबविण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले.