मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काही नगरसेवकांनी विकत घेतलं, असे वक्तव्य विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी सभागृहात केले. पेडणेकर यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात भाजपसह शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत पेडणेकर यांनी सभागृहात माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. मात्र पेडणेकर यांनी माफीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापौर रितू तावडे यांनी आधी १० मिनिटं नंतर सभागृहातील गोंधळ लक्षात घेता सभागृह विना कामकाज तहकूब केले.
पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या अंत्यविधी दरम्यान महापौरांचा अपमान झाल्याचा हरकतीचा मुद्दा ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाख राऊत यांनी उपस्थित केला.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांमध्ये वाढलो आहोत. काही पक्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच विकत घेतले, असे वक्तव्य करून हातवारे करत पेडणेकर सभागृहाबाहेर पडल्या. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. शिवसेनाप्रमुख हे प्रत्येक माणसासाठीच नाही तर, संपूर्ण देशवासीयांसाठी वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांना विकत घेण्याची भाषा करू नका, असे सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठणकावून सांगितले. यावेळी महापौर रितू तावडे यांनी बाळासाहेब यांचा अपमान करणाऱ्या पेडणेकर यांनी माफी मागावी, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पेडणेकर माफी मागण्यास तयार झाल्या नाहीत.
अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पेडणेकर यांना माफी मागण्याची विनंती केली. बाळासाहेबांबद्दल आपण चुकीचे बोललो असेल तर माफी मागण्यात कमीपणा कसला. मी स्वतः चुकीचे बोललो असतो तर हजार वेळा माफी मागितली असती. त्यामुळे पेडणेकर यांना माफी मागावीच लागेल. शिंदे यांच्या वक्तव्यानंतरही पेडणेकर यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर, शिंदे यांनी कोणतेही कामकाज न करता झटपट सभा तहकुबी मांडली. याला शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी अनुमोदन दिले. अखेर महापौर यांनी सभागृह तहकूब केले.
शिवसेनेकडून निलंबनाची मागणी
किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्यासारखेच होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम ३६ अ अंतर्गत त्यांचे निलंबन करण्याची मागणी आपण महापौरांकडे करणार असल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले.
सभेचे कामकाज आता थेट प्रक्षेपित
पालिका सभागृहाच्या कामकाजाची पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना कामकाजाची थेट माहिती मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवारपासून पालिकेच्या प्रत्येक सभेचे अधिकृत सोशल मीडिया पेजवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.