Mumbai : नमूद जागेवरच व्यवसाय करा, अन्यथा कारवाई X| BMC
मुंबई

Mumbai : नमूद जागेवरच व्यवसाय करा, अन्यथा कारवाई

पदपथ पादचाऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्रफळातच व्यवसाय करावा.

Swapnil S

मुंबई : पदपथ पादचाऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्रफळातच व्यवसाय करावा. विहित क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा व्यापून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ अभियानाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीची आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी सकाळी मुंबई शहरातील विविध भागांत तब्बल तीन तासांहून अधिक काळ प्रत्यक्ष पाहणी केली.

आयुक्तांनी डी विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरूचा छेद गल्ली, नाना शंकरशेट मार्ग, ताडदेव मार्ग; ई विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग, संत सावता मार्ग; बी विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट, काझी सय्यद मार्ग; सी विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स, चंदनवाडी तसेच ए विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई आणि महापालिका मार्ग परिसराची पाहणी केली.

पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही समाधानकारक असली तरी त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. पादचाऱ्यांना हा बदल प्रत्यक्ष मार्गक्रमण करताना स्पष्टपणे जाणवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पदपथांवरील झाडांची मुळे सुरक्षित राहतील, याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार फांद्यांची योग्य छाटणी करावी आणि असुरक्षित झाडांचे नियमानुसार व शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

ई विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोड येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी, संत सावता मार्गावरील उदंचन केंद्र तसेच मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. पदपथ मोकळे करण्यासाठी आणि कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत.

मात्र, नागरिकांनीही पदपथांवर साहित्य ठेवू नये, वाहने उभी करू नयेत आणि पदपथ, रस्ते किंवा अन्यत्र कचरा टाकू नये. ‘पादचारी प्रथम’ अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

कचऱ्याचा प्रकार थैलीवर स्पष्टपणे नमूद करावा !

वारंवार कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना योग्य पद्धतीने करावी तसेच वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित थैलीवर स्पष्टपणे नमूद करावा, असेही त्यांनी सांगितले.

फेरीवाल्यांच्या परवान्यांची तपासणी

पाहणीदरम्यान आयुक्तांनी काही फेरीवाल्यांच्या परवाना प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष तपासणी केली. अधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय करण्यास हरकत नसली तरी त्यांच्या व्यवसायामुळे पादचाऱ्यांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये. तसेच परिसरात स्वच्छता राखावी, अशा सूचना फेरीवाले व त्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक आणि नायर रुग्णालय परिसरात पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंत्रालयातील चेहरा पडताळणी यंत्रणेचा बोजवारा; ४१ कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

२ कोटी मतदार वगळणार? राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा आक्षेप

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून बहिणींचा मृत्यू

एमडीची ‘डिलिव्हरी’ होण्याआधीच दणका; कोपरीत २.३० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, गोवंडीतील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा