मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सब-वे जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सब वेतील वाहतूक सुरळीत रहावी पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उड्डाणपुलावर पूल उभारणीच्या हालचाल पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र पूल उभारणे अशक्य आहे, असा अहवाल सल्लागाराने मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सब-वे तुंबणारच, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अंधेरी सब-वे जलमयमुक्त करण्यासाठी अंधेरी सब-वे वरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला होता. पूल उभारणे कितपत शक्य होईल हे तपासणीसाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली.
सब वे वरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा व्यवहार्यता अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. सब वे वरून पुलाची उभारणी केल्यानंतर पुलाचे दोन्ही पोहोच रस्ते उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, यासह अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने पूल उभारणी शक्य नाही, असा अहवाल सल्लागाराने दिल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे अंधेरी सब वे पावसाळ्यात तुंबणारच हे स्पष्ट झाले आहे.
पर्यायी नियोजन काय?
मुंबईत थोडासा जरी पाऊस झाला तरी सखल भागात पाणी साचते. अंधेरी सब-वे ही अनेकदा पावसामुळे पाण्याखाली जातो आणि वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. अंधेरी सब-वेत पावसाळ्यात वरून एका सेकंदात मोठ्या वेगाने एक हजार लिटर पाणी खाली येते. त्यामुळे सब-वे पाणी जमा होते.
यावर उपाय म्हणून मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाला बांधण्याचा प्रस्ताव तूर्तास संथगतीने पुढे जात आहे. २०९ कोटी रुपये खर्च करूनही अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
अंधेरी सब-वे पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेकडे तूर्तास कोणतेही नियोजन नसल्याचे समोर आले आहे.