मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकारावरून बुधवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या कृतीचा निषेध करीत ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. मात्र, महापौर रितू तावडे यांनी कामकाज सुरूच ठेवल्याने संतप्त ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. काँग्रेसनेही या भूमिकेला पाठिंबा देत सभात्याग केल्याने सभागृहातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉगिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) पक्षाने केला होता. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार संजय निरुपम, प्रवक्त्या शायना एनसी आणि शीतल म्हात्रे उपस्थित होते. यावेळी शायना एनसी यांच्याकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेले. त्यानंतर त्यांनी चूक लक्षात येताच त्यांनी फोटो पुस्तकात ठेवले. मात्र हा प्रकार समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
बुधवारी पालिका सभागृहाचे कामकाज सुरू होताच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी निवेदन करण्याची परवानगी मागितली. मात्र, महापौर रितू तावडे यांनी सुरुवातीला त्यांना बोलण्याची अनुमती दिली नाही. शिवसेनाप्रमुखांबद्दल सर्वांच्याच मनात आदर आहे; मात्र सभागृहाचे कामकाज थांबवता येणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली.