मुंबई : ऐन पाणी टंचाईच्या काळात टँकर लाॅबीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी टँकर भरणा केंद्रांवर फ्लो मीटर बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहर, पश्चिम व पूर्व उपनगरांतील २४ तास सुरू असलेल्या ३१ टँकर भरणा केंद्रांवर इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आधारित इनलाइन अल्ट्रासॉनिक जलमापक बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे टँकरमध्ये किती पाणी भरले याची दर १५ मिनिटांनी माहिती उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे टँकर लॉबीला लगाम बसणार आहे.
२०२६ च्या उन्हाळ्यात मुंबईत पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. फेब्रुवारी ते मे या कालावधीत अनेक नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. मात्र, टँकर भरणा केंद्रांवरून दररोज किती पाणी वितरित केले जाते, याची एकत्रित माहिती महापालिकेच्या नियोजन व नियंत्रण विभागाला तत्काळ उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे वितरणाचे नियोजन आणि नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, पाण्याचे मोजमाप अधिक अचूक होणार आहे.
असा आहे शुल्क आकारणीचा दर
या कामासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी मेसर्स हॅपी सोल्युशन्स या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ३.३० टक्के कमी म्हणजेच १ कोटी १२ लाख ८० हजार ५७ रुपयांचा देकार दिला. हा सर्वात कमी दर असल्याने कंपनीची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. १८ टक्के जीएसटीसह कंत्राटाची रक्कम १ कोटी ३३ लाख १० हजार ४६७ रुपये असून त्यावर १० टक्के पर्यवेक्षण शुल्क धरून एकूण खर्च १ कोटी ४६ लाख ४१ हजार ५१४ रुपये होणार आहे.
सहा महिन्यांत जलमापकांचा पुरवठा
कंत्राटाचा कालावधी ६० महिन्यांचा असून पहिल्या सहा महिन्यांत जलमापकांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर ५४ महिने संचालन व देखभाल केली जाणार आहे. जलमापकांसाठी ३६ महिन्यांची हमी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती व पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासन पातळीवर अंमलबजावणीचा सुरुवात होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.
पाणी वितरण प्रक्रियेवर नजर !
मुंबईतील टँकर लॉबी मोडीत काढण्यासाठी टँकर भरणा केंद्रांवर डिजिटल फ्लो मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लो मीटर बसवल्याने किती पाणी वितरित झाल्याचे अचूक मोजमाप करणे शक्य होणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्यातील अनियमितता रोखण्यासह टँकर लॉबीला लगाम घालणे शक्य होणार आहे.
पारंपरिक पद्धत बदलून डिजिटल यंत्रणा
पालिकेने २०१९ मध्ये टँकर भरणा केंद्रांवर ६४ यांत्रिक जलमापक बसवले होते. हे जलमापक अद्याप कार्यरत असले, तरी त्यांच्यामध्ये आयओटी आधारित माहिती पाठवण्याची सुविधा नाही. त्यामुळे माहिती रजिस्टरमध्ये नोंदवण्यावर भर होता. आता ही पारंपरिक पद्धत बदलून डिजिटल यंत्रणा बसवण्यात येणार आहे.