मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी, जुहू, गोरेगाव, मालाड-मढ-मार्वे परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. या ठिकाणच्या जुन्या जलवाहिन्या बदलून जलवाहिन्यांचे नव्याने जाळे विस्तारले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३० कोटी ९६ लाख रुपये खर्च करणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे अंधेरी, जुहू, गोरेगाव, मालाड परिसरात धो-धो पाणीपुरवठा होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरात कमी दाबाने पाणी होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त होत असतात. त्यामुळे भविष्यात जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. परिमंडळ ६ व परिमंडळ ७ मधील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध व्यासांच्या मुख्य जलवाहिन्या टाकणे, बदलणे आणि संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांसाठी महापालिकेने ई-निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पामुळे अनेक भागांतील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गळती आणि जुन्या जलवाहिन्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.
या भागातील पुरवठ्यात सुधारणा
अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम आणि जोगेश्वरी पश्चिमेकडील काही भाग
गोरेगाव (पश्चिम-पूर्व) परिसर, मालाड (पश्चिम व पूर्व), मार्वे, मढ आणि मनोरी परिसर
मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या
पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत परिमंडळ ६ व ७ मधील सहा विभागांचा समावेश असून १५० मिमी ते १२०० मिमी व्यासाच्या जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.
या विभागात होणार कामे
या प्रकल्पांतर्गत १५० मिमी, ३०० मिमी, ४५० मिमी, ६०० मिमी, ७५० मिमी, ९०० मिमी आणि १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्यांची तरतूद, टाकणे व बदलणे ही कामे केली जाणार आहेत. ही कामे के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/मध्य आणि आर/उत्तर विभागांत केली जाणार आहेत.