मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड परिसरात पर्यटक आणि नागरिकांसाठी अत्याधुनिक बायो टॉयलेट उभारण्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ४ कोटी १९ लाख रुपये खर्च करणार आहे. मरीन ड्राइव्ह परिसरात पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता जागतिक दर्जाच्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वपूर्ण ठरला आहे. कोस्टल रोडची सफर करताना मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी याठिकाणी अत्याधुनिक बायो टाॅयलेट उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या स्वच्छतागृहांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये व्हॅक्यूम तंत्रज्ञानावर आधारित फ्लश व्यवस्था असणार आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानासारख्या या व्यवस्थेमध्ये एका फ्लशसाठी केवळ एक लिटर पाण्याचा वापर होणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. मुंबईसारख्या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरात पाण्याची बचत करण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरू शकते.
स्वच्छतागृहांना सौरऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार असून, त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. पुरुष, महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.
वापरासाठी मोजावे लागणार पैसे
स्वच्छतागृहांसाठी पुरुषांना १० रुपये, तर महिलांना पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छतागृहांच्या उभारणीनंतर पुढील १८ महिन्यांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे.
देखभाल महत्त्वाची
पालिकेने ओव्हल मैदान परिसरात ३५ लाख खर्चून स्वच्छतागृह उभारले होते. मात्र, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतील तांत्रिक समस्येमुळे ते अल्पावधीतच बंद पडले. त्यामुळे नव्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत केवळ तंत्रज्ञान आणि आकर्षक सुविधा उभारण्यापेक्षा त्यांची कार्यक्षमता, सांडपाणी व्यवस्थापन आणि देखभालीला अधिक महत्त्व द्यावे लागणार आहे.