मुंबई : मुंबई महापालिकेच्या शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे विभागांतील क्षेत्र वाहतूक नियंत्रण (एरिया ट्रॅफिक कंट्रोल - एटीसी) व्यवस्थेअंतर्गत असलेल्या वाहतूक नियंत्रकांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेला पुन्हा एकदा फेरनिविदा काढावी लागणार आहे. निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलींचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर खर्चाचा अंदाज आणि आर्थिक बाबींचा फेरविचार आवश्यक ठरल्याने सक्षम प्राधिकाऱ्याने नव्याने निविदा मागविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि नाॅन एटीसी वाहतूक नियंत्रण यंत्रणा अशा दोन कंत्राटासाठी ११ कोटी ४२ लाख ३६ हजार ७४१ रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
महापालिकेने या कामासाठी १ जुलै २०२६ ते ३० जून २०२८ या कालावधीसाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विद्यमान कंत्राट ३० जून २०२६ रोजी संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदार नियुक्त करणे आवश्यक होते. त्यासाठी तुकडेवारी तत्त्वावर तीन लिफाफा पद्धतीने निविदा मागवण्यात आल्या होत्या.
पुनर्मूल्यांकन करणार
निविदा प्रक्रियेत शहर विभागासाठी मे. ट्रॅफिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ८ टक्के कमी दराने बोली सादर केली होती तर पश्चिम आणि पूर्व उपनगर विभागांसाठी मे. सीएमएस ट्रॅफिक सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीने अंदाजापेक्षा ३.३३ टक्के कमी दराची बोली दिली होती. प्रथमदर्शनी बोली कमी दराच्या दिसत असल्या तरी कर, इतर आर्थिक तरतुदी आणि खर्चाचा विचार केल्यानंतर निविदांमधील आर्थिक बाबींचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज जाणवली. त्यामुळे आता १ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी नव्याने निविदा काढली जाईल.
अर्थसंकल्पीय तरतूद
महापालिकेने या कामासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात २७.६४ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. उर्वरित खर्च पुढील आर्थिक वर्षांतील प्रस्तावित निधीतून तसेच आवश्यक पुनर्विनियोजनाद्वारे भागवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कंत्राट पुन्हा एकदा प्रशासकीय प्रक्रियेत
मुंबईतील प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या देखभाल कराराला महत्त्व आहे. मात्र निविदा प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे वाहतूक नियंत्रकांच्या देखभालीचे कंत्राट पुन्हा एकदा प्रशासकीय प्रक्रियेत अडकले आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.