मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून निघालेल्या फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एक मृतदेह सापडल्याने हा आकडा १४ वर गेला होता. त्यानंतर शनिवारी बेपत्ता असलेल्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह शोधमोहिमेत सापडला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.
'नीलकमल' ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन बुधवारी घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका 'स्पीड बोट'ने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली होती. या अपघाताला ४८ तासांहून अधिक कालवधी झाला असतानाही नीलकमल बोटीवरील सात वर्षांचा मुलगा जोहान निसार अहमद हा बेपत्ता होता. शनिवारी त्याचाही मृतदेह सापडला आहे. त्याचा मृतदेह नौदलाच्या पथकाला आढळून आला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्या होत्या.
त्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून तक्रारदारासह ११ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अपघातग्रास्त नीलकमल बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणीही केली जाणार आहे. त्यात मेरीटाइम बोर्डाचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय नौदलाकडूनही याप्रकरणी तपासणी करण्यात येणार आहे.
नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
मुंबई सागरी मंडळाने अखेर आता 'नीलकमल' बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. तसेच बोटीतील डेकची जबाबदारी असणाऱ्या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणाऱ्या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.