Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला  
मुंबई

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याचे समोर आले आहे. मात्र आता भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना ओसी मिळेल, याची प्रतीक्षा वाढली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याचे समोर आले आहे. मात्र आता भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना ओसी मिळेल, याची प्रतीक्षा वाढली आहे. भोगवटा प्रमाणपत्र इमारतींना देण्याकरिता अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे घेण्यात आला आहे.

मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले आहे. १७ नोव्हेंबर २०१६ पासूनच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अभय योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारित नियमावली तयार करा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सुधारित नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असल्याचे अश्विनी जोशी यांनी यावेळी सांगितले. इमारतींचे बांधकाम नियमानुसार न करता वाढीव काम केले किंवा काही बदल केल्याचे निदर्शनास आले तर मुंबई महापालिका अशा इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देत नाही.

पालिकेच्या आराखड्यानुसार काम झाले नसले तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र नियमापेक्षा जादा दराने पाणी शुल्क आकारले जात आहे. मात्र मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा हा प्रश्न जुना असून विकासक इमारत बांधून मोकळे होतात आणि तिथे राहायला आलेल्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अखेर नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि विकास व नियोजन विभागाच्या वतीने ओसी नसलेल्या इमारतींना ओसी देण्याबाबत अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र सुधारित नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असल्याने प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या नगरविकास खात्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार, या अभय योजनेअंतर्गत भोगवटाकरिता कार्यान्वित करावयाच्या प्रस्तावाची पूर्वीची तारीख २५ मार्च १९९१ ही वाढवून ६ जानेवारी २०१२ पर्यंत अर्थात फंजिबल लागू होण्यापूर्वीच्या या प्रकरणांमध्ये मुदत वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीपासून वास्तव्य होत असलेल्या तथा बांधकाम परवानगी दिलेल्या इमारतींकरता सुधारित मुदत विचारात घेण्यात यावी, अशी सूचना केली. त्यानुसार मुंबई महापालिकेने या अभय योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे बनवली आहेत. या मार्गदर्शक धोरणांमध्ये निवासी इमारती, रुग्णालये आणि शाळेच्या इमारती यांना या ओसी प्रमाणपत्रासाठी अभय योजनेत भाग घेता येऊ शकतो.

या इमारतींना मिळणार लाभ

जी इमारत किंवा इमारतीचा भाग १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीपासून वापरात आहे आणि ज्या सदनिका ८० चौरस मीटरपर्यंतच्या चटई क्षेत्रफळाच्या आहे, अशा इमारतींना याचा लाभ मिळणार आहे. या अभय योजनेतंर्गत पुनर्विधी ग्राह्यता शुल्क, बाल्कनी बंदिस्त करण्याचे, ओटला बंदिस्त करण्याचे, माळा शुल्क दंड, अर्ज फी इत्यादींच्या रकमेवरील शुल्कात या अभय योजनेतंर्गत प्रचलित धोरणांनुसार नियमित शुल्कांवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. प्रस्ताव पहिल्या सहा महिन्यांमध्ये सादर झाल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. पण त्यानंतर आल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के सवलत दिली जाणार आहे आणि त्यानंतर आल्यास कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अभय योजना प्रस्ताव मागे घेतला असून सुधारित नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे असलेला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"