मुंबई : मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील आणखी २२ उपनगरीय लोकल सेवा या १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांची अंमलबजावणी शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ पासून होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या ३२ वरून ५४ होणार आहे. यामध्ये गर्दीच्या वेळेतील ११ सेवांचा समावेश असल्याने मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
उपनगरीय मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने सध्या चालविण्यात येत असलेल्या १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
सायंकाळी गर्दीच्या वेळेत घरी परतणाऱ्यांना फायदा
संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रात्री ७.४२ वाजता आणि सीएसएमटी-कर्जत लोकल रात्री ७.५० वाजता सुटणार आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर मुंबईहून उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त आसनक्षमता उपलब्ध होणार आहे. काही सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १५ डब्यांच्या सेवांच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काही लोकलच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावेल आणि ती खोपोलीहून पहाटे ४.५० वाजता सुटेल. तसेच परेल-खोपोली लोकल आता दादर-खोपोली म्हणून धावेल आणि दादरहून सकाळी ७.४३ वाजता सुटेल.
रात्री ११.२३ची दादर-अंबरनाथ लोकल शनिवारी रद्द
याशिवाय सीएसएमटी-अंबरनाथ १५ डब्यांची लोकल आता दादर-अंबरनाथ म्हणून धावणार असून ती दादरहून रात्री ११.२३ वाजता सुटून अंबरनाथला मध्यरात्री १२.३० वाजता पोहोचेल. मात्र ही सेवा शनिवारी देखभालीच्या कामासाठी रद्द राहणार आहे. तर सीएसएमटी-खोपोली आणि सीएसएमटी-अंबरनाथ या दोन सेवांचे स्लोवरून फास्ट सेवेत रूपांतर करण्यात आले आहे.
उपनगरीय सेवांच्या संख्येत मात्र वाढ नाही
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रथमच १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी १६ सेवा १५ डब्यांच्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ४ एप्रिल २०१९ रोजी आणखी सहा सेवा १५ डब्यांच्या करण्यात आल्याने ही संख्या २२ वर पोहोचली. त्यानंतर २० जुलै २०२६ रोजी आणखी १० सेवा १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या करण्यात आल्या आणि एकूण संख्या ३२ झाली. आता आणखी २२ सेवांची भर पडल्याने मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकलची संख्या ५४ झाली आहे. या बदलामुळे एकूण उपनगरीय सेवांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नसून ती दररोज १,८२० सेवांवर कायम राहणार आहे. मात्र विद्यमान सेवांमध्ये अधिक डबे जोडल्यामुळे गर्दीच्या मार्गांवर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे.
१५ डब्यांच्या करण्यात येणाऱ्या प्रमुख सेवा
डाउन दिशेतील सेवा
दादर-खोपोली : सकाळी ७.४३
सीएसएमटी-कर्जत : सकाळी ९.५७
कर्जत-खोपोली : सकाळी १०.४०
कर्जत-खोपोली : दुपारी १२.००
कर्जत-खोपोली : दुपारी १.१५
सीएसएमटी-कर्जत : दुपारी २.४५
सीएसएमटी-बदलापूर : सायंकाळी ४.४२
सीएसएमटी-अंबरनाथ : सायंकाळी ७.४२
सीएसएमटी-कर्जत : सायंकाळी ७.५०
सीएसएमटी-खोपोली : रात्री १०.५७
सीएसएमटी-अंबरनाथ : मध्यरात्री १२.०५
अप दिशेतील सेवा
खोपोली-दादर : पहाटे ४.५०
अंबरनाथ-सीएसएमटी : सकाळी ८.२७
खोपोली-कर्जत : सकाळी १०.००
खोपोली-कर्जत : सकाळी ११.२०
खोपोली-कर्जत : दुपारी १२.४०
कर्जत-सीएसएमटी : दुपारी १२.२३
खोपोली-सीएसएमटी : दुपारी १.४८
कर्जत-सीएसएमटी : सायंकाळी ५.३३
बदलापूर-सीएसएमटी : सायंकाळी ६.१७
कर्जत-सीएसएमटी : रात्री १०.०३
अंबरनाथ-दादर : रात्री ९.०७
प्रवासी वहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार
या सेवांचा लाभ विशेषतः अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली येथून मुंबईकडे येणाऱ्या तसेच मुंबईहून परत त्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. प्रत्येक लोकलमध्ये तीन अतिरिक्त डबे जोडल्याने तिची प्रवासी वहन क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. १५ ऑगस्टपासून १५ डब्यांच्या करण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळेतील दोन महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे.