मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड, कांजूरमार्ग येथील रिले रूमला लागलेल्या आगीमुळे सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वेची लोकल आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली. यामुळे दिवसभरात सुमारे ६० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर शेकडो लोकल विलंबाने धावत होत्या.
या सिग्नल बिघाड दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला तब्बल ९ तास लागले. हा गोंधळ सुरू असतानाच भांडुप स्थानकात रूळ ओलांडताना लोकलची धडक बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत ऑफिस गाठावे लागले, त्यानंतर घरी परततानाही पुन्हा तेच रडगाणे त्यांच्या नशिबी आले.
सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिवसभर प्रयत्न केले. त्यामुळे डाऊन जलद मार्ग दुपारी ४.१० वाजता, अप-जलद मार्ग ४.४६ वाजता, डाऊन धीमा मार्ग सायंकाळी ५.३० वाजता, तर अप धीमा मार्ग सायंकाळी ६.१८ वाजता वाहतुकीसाठी सुरक्षित घोषित करण्यात आला. त्यामुळे सकाळी सुरू झालेल्या रेल्वे वाहतूककोंडीचा परिणाम सायंकाळपर्यंत जाणवला. सायंकाळी सीएसएमटी स्थानकात प्रचंड गर्दी उसळली.
भांडुप - विक्रोळी दरम्यानचे सिग्नल पडले बंद
सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत सकाळी ९.२३ वाजता मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वीजवाहिनीवर तार अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपत्कालीन वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. दुरुस्तीसाठी सकाळी १० ते सकाळी १०.४८ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. त्याचदरम्यान, सकाळी ९.३० वाजता कांजूरमार्ग येथील रिले रूमला आग लागली. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने भांडुप ते विक्रोळी दरम्यानचे सर्व सिग्नल बंद पडले.
आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती
कांजूरमार्ग येथील रिले रूमला लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेने चौकशी समिती गठीत केली आहे. प्राथमिक चौकशीत स्पार्क झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र, चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मोटरमनची कमतरता : ‘हार्बर’ही कोलमडली
मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे हाल सुरू असतानाच हार्बर मार्गावर मोटरमनच्या कमतरतेमुळे लोकल सेवांच्या विलंबात भर पडली. हार्बर मार्गावरील पनवेल, वांद्रे, गोरेगाव आणि वाशीच्या दिशेने धावणाऱ्या लोकल दुपारनंतरही २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. दुपारी ३.२८ वाजताची सीएसएमटी-पनवेल लोकल चुनाभट्टी येथे ३० मिनिटे, तर दुपारी ३.३२ वाजताची सीएसएमटी-वांद्रे लोकल माहिम येथे २८ मिनिटे उशिराने धावत होती. दुपारी ३.३६ वाजताची वातानुकूलित पनवेल लोकल रे रोड येथे ३८ मिनिटे विलंबाने पोहोचली. तसेच दुपारी ३.४४ वाजताची पनवेल लोकल वडाळा-जीटीबी नगरदरम्यान २१ मिनिटे, तर दुपारी ३.४८ वाजताची गोरेगाव लोकल सीएसएमटी येथे ३६ मिनिटे उशिराने धावत होती. दुपारी ३.५४ वाजताची सीएसएमटी-वाशी वातानुकूलित लोकलही ३० मिनिटे विलंबाने असल्याची नोंद झाली.
भांडुपला रूळ ओलांडणारा तरुण ठार
भांडुप स्थानकातील रेल्वे ट्रॅकवरून जात असताना एसी लोकलच्या धडकेत साहिल थिटे (२१) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण मुलुंड कॉलनीमधील अमर नगर परिसरात वास्तव्यास होता. भांडुप रेल्वे स्थानकावर ४ नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील लोकल पकडण्यासाठी जात असताना एसी लोकलची धडक त्याला बसली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. एकीकडे लोकलकल्लोळ सुरू असतानाच, ही घटना घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. साहिलच्या कुटुंबियांनीही रेल्वे प्रशासनावर मृत्यूचे खापर फोडले आहे.
विक्रोळी रेल्वेमार्गावर दोन मृतदेह
घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सोमवारी सायंकाळी रेल्वे रुळांवर दोन मृतदेह आढळून आले. मोटरमनच्या निदर्शनास हे मृतदेह आले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेगडे यांनी सांगितले की, या घटनेबाबत सध्या भाष्य करता येणार नाही. मोटरमनच्या केबिनमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल. दोन्ही मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. जीआरपी पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तींना रेल्वेची धडक बसली होती की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी
या घटनेमुळे लोकलचा वेग कमी ठेवून लोकल चालवण्यात आल्या. साधारणपणे ताशी ५ ते १० किमी वेगाने लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे कल्याण, कसारा, कर्जत आणि खोपोली मार्गावरील लोकल ६० ते ९० मिनिटे उशिराने धावल्या. लोकल नसल्याने रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी उसळली, तर अनेक प्रवासी रुळांवर उतरून चालत गेले.
प्रवासी लोकलमध्ये तासन्तास अडकून पडले
सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने मोटरमनना विशेष खबरदारी घेऊन लोकल चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘ए बोर्ड’च्या नियमानुसार गाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे फलाटांवर प्रवाशांची गर्दी वाढली. कल्याण, दिवा, ठाणे, घाटकोपर आणि विक्रोळी यांसह अनेक स्थानकांवर प्रवाशांना लोकलची प्रतीक्षा करावी लागली. विलंबामुळे अनेक प्रवासी लोकलमध्ये तासन्तास अडकून पडले.