मुंबई

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; प्रवासी संतप्त, रुळांवरून पायपीट

Mumbai Local Train : मुलुंड-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लोकल ५२ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Mayuri Gawade

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. गेल्या आठवड्यात लोकलच्या विलंबामुळे संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज, सोमवारी (दि. २६) सकाळी पुन्हा लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये दुसरी तार अडकल्याने अनेक लोकल २० ते ५२ मिनिटे उशिराने धावल्या. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कार्यालयात आणि महाविद्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही लोकल स्थानकांदरम्यानच रखडल्याने प्रवाशांना रेल्वे रुळांवरून पायी चालत जावं लागलं. याचे व्हिडिओही समोर आले आहेत. वारंवार लोकल उशिराने धावत असल्याने वेळेवर घरातून निघूनही अनेकांना कामावर लेटमार्क लागतो. रेल्वेच्या सततच्या खोळंब्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप वाढत आहे.

ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद

सोमवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास, मुलुंड-ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये दुसरी तार अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वेच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आणि लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी १० वाजल्यापासून संबंधित ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करून ब्लॉक घेतला. त्यानंतर तांत्रिक पथकांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, या कामाला वेळ लागत असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले.

स्थानकांवर गर्दी, प्रवाशांची गैरसोय

या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-कसारा तसेच कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवांवरही झाला. अनेक फेऱ्यांना उशीर झाला, तर काही लोकल रद्द किंवा अंशतः रद्द झाल्याची माहिती आहे.

सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने मुलुंड, ठाणे, घाटकोपर, विक्रोळी, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. काही गाड्या स्थानकांदरम्यान थांबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवासी रेल्वे रुळांवरून पायी चालत जात आहेत.

लोकल सेवा कधी सुरळीत होणार?

ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेली तार काढण्यासाठी रेल्वेचे तांत्रिक पथक काम करत आहे. वीजपुरवठा पूर्ववत करून लोकल वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असल्याने लोकलच्या वेळापत्रकावर आणखी काही काळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

राहुल गांधी यांचा १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा

Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड सरकारपुढे जास्तच नम्र राहिले; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. के. कौल यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय विमानांचे नवी मुंबईतून उड्डाण; मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुनर्विकासामुळे IndiGo, Air India ची सज्जता