मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांना घरी घेऊन चाललेल्या एका व्हॅनवर झाड कोसळून चेंबूरमध्ये ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून आठ जण थोडक्यात बचावले.
दुपारचे वर्ग संपल्यानंतर ‘युनिव्हर्सल हायस्कूल’च्या स्कूल व्हॅनने विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले असता चेंबूर रोड नंबर ११ येथे या स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळले. यावेळी व्हॅनमध्ये १३ विद्यार्थी होते. झाड कोसळल्याचे कळताच चालक व वाहकाने स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि जवळील झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र विहान श्रीवास्तव (११ वर्षे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या घटनेमुळे चेंबूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे झाड धोकादायक असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती, याबाबत चौकशी केली जाणार असून निष्काळजीपणा निदर्शनास आला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे महापौर रितू तावडे यांनी दिला. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुंबईत सोमवारी रात्रीपासून पाऊस बरसत होता आणि मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातच दुपारी २.४५ च्या सुमारास चेंबूर, ५३८, हेरिटेज प्राईड, रोड क्रमांक ११ येथील 'युनिव्हर्सल हायस्कूल'च्या 'मेक फोर्स' कंपनीच्या स्कूल बसवर पिंपळाचे जुने झाड अचानकपणे कोसळले.
घटनेनंतर अग्निशामक दल तसेच इतर बचाव यंत्रणांनी बसकडे धाव घेतली व १२ जखमी मुलांना बाहेर काढले. बसवर कोसळलेले झाड अत्यंत वजनी आणि मोठे असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबी मशीन बोलावण्यात आले आणि अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने बसवर कोसळलेला झाडाचा मोठा भाग कापून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. ही अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडताच प्रशासनाने घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाचारण केल्या.
बस थांबलेली असताना दुर्घटना
अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेली इयत्ता आठवीची विद्यार्थिनी क्रिशा रॉय म्हणाली, "बस एका विद्यार्थ्याला सोडण्यासाठी थांबली होती, तेव्हाच अचानक मोठा आवाज झाला. झाड बसवर पडले आणि मी आतमध्ये अडकले होते. आजूबाजूच्या इमारतींमधील लोकांनी आम्हाला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले." या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विहानबद्दल बोलताना शिक्षिका दर्शिका मेहता म्हणाल्या, "तो खूप हुशार आणि उत्साही मुलगा होता. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तो शाळेच्या क्रीडा पथकाचाही भाग होता आणि त्याचे भविष्य खूप उज्ज्वल होते."
दोषींवर कारवाई करणार : मुख्यमंत्री
चेंबूर येथील दुर्घटनेप्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे, महापौर रितू तावडे यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे मुख्यत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेची चौकशी करून त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
घटनास्थळी पाहणी प्रसंगी महापौरांसमवेत आमदार तुकाराम काते, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक् राजेश्री शिरवडकर, प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे, बाजार व उद्याने समिती अध्यक्ष हेतल गाला, नगरसेविका समृद्धी काते, नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेविका स्नेहल शिवकर तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, परिमंडळ उपायुक् संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर भोसले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता उप महापौर संजय घाडी यांनी, दुर्घटनाग्रस्त झाडाचे ऑडिट झाले होते की नाही, याबाबत माहिती घेण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. तसेच, महापालिकेकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे उप महापौर संजय घाडी यांनी सांगितले.
उद्यान अधीक्षकांवर कारवाई करा : किशोरी पेडणेकर
मुंबईतील सर्वच झाडांचे पावसाळ्यापूर्वी ऑडिट करायला पाहिजे होते. या घटनेप्रकरणी महापालिका उद्यान अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.