मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अनेक कठडे आणि बेंचेस तुटलेल्या अवस्थेत असून विद्युत दिव्यांची व्यवस्थाही योग्य नसल्याची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी केली. त्यांनतर आता ही सर्व कामे येत्या निवडणुकीनंतर केली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची डागडुजीच्या कामांची सर्वप्रकारची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने या कामांना निवडणुकीनंतर सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सकाळी व सायंकाळी चालण्याकरिता, धावण्याकरिता, व्यायामाकरिता व खेळण्याकरिता अनेक नागरिक येत असतात. तसेच याठिकाणी नागरिकही फिरण्यास येत असत असतात. याठिकाणी संपूर्ण कट्टा काही वर्षांपूर्वी सुशोभित करण्यात आला होता. या कट्ट्यावर विविध रंगसंगती असलेल्या चौकोनी आकाराचे तुकडे (चिप्स) लावण्यात आले आहेत. ते बदलून पूर्वीसारखा कट्टा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
१ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च होणार
मैदान परिसरात सुधारणा तसेच नियमित देखभाल, दुरुस्ती तसेच स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात परिसरातील कट्ट्यांची दुरुस्ती करतानाच पुरेशा प्रकाश व्यवस्थेच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गगराणी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुषंगाने या जी उत्तर विभागामार्फत, छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर येथील कठडे, बेंचेंस तसेच झाडांभोवतीचे कठडे व विद्युत कामे पार हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. ही सर्व कामे निवडणुकीनंतर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.