मेघा कुचिक/मुंबई
मुंबई शहर पाहण्याच्या ओढीने बिहार आणि हरयाणातून पळून आलेल्या चार अल्पवयीन बालकांची वाकोला पोलिसांनी सुटका केली असून त्यांची सुखरूप त्यांच्या कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणली आहे. ही घटना १३ ऑगस्टला उघडकीला आली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सांताक्रूझ पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर चार मुले फिरत असून काही अज्ञात व्यक्ती त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वाकोला पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ 'निर्भया पथक' घटनास्थळी रवाना केले.
पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केसरे, पोलीस अंमलदार सुनील गायकवाड आणि निर्भया पथकाने सांताक्रूझ पूर्व येथील जकू क्लबजवळील प्रभात कॉलनी रोडवर पोहोचून पाहणी केली. तेथे ही मुले प्रचंड घाबरलेल्या आणि भुकेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी त्यांना तत्काळ वाकोला पोलीस ठाण्यात आणून खाऊ-पिऊ घातले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून चौकशी सुरू करण्यात आली. या चार बालकांपैकी तीन जण एकमेकांचे भाऊ-बहीण असून ते दानापूर (पटणा, बिहार) येथील रहिवासी आहेत, तर चौथा मुलगा पाबनेरा गाव (सोनिपत, हरयाणा) येथील आहे. हुसेन सताना (१४), झैनब सताना (१५), मसिजा सुताना (३, तिघे रा. दानापूर) आणि नवीन चंदर (१२, रा. सोनिपत, हरयाणा) अशी त्यांची नावे आहेत.
वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेनिशी करंडे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केसरे, पोलीस अंमलदार वृषाली राजपुरे, सुनील गायकवाड, तेजश्री ठोकळे आणि राऊत यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सोशल मीडिया व सर्च इंजिनच्या माध्यमातून देशभरातील ठाण्यांमधील अपहरण किंवा बालके बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची तपासणी केली.
अशी गाठली मुंबई
ही बालके केवळ मुंबई शहर पाहण्याच्या इच्छेने कोणालाही न सांगता घरातून निघून आल्याचे समोर आले. बिहारमधील दानापूर येथील तीन भाऊ-बहीण गावातील जत्रेमध्ये गेले होते. जत्रा काही दिवस चालणार असल्याने ते तिथेच राहत होते. तेथून त्यांनी पालकांना न सांगता मुंबईची ट्रेन पकडली. याच ट्रेनमधून प्रवास करणारा नवीन चंदर हादेखील त्यांच्यासोबत मुंबईत आला.