मुंबई : उघड्यावर थुंकलात, रस्त्यावर कचरा फेकला, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २००, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी आता तरी मुंबईकरांनो सुधरा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, हा उपकायदा बनवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत.
असा आकारणार दंड -
रस्ते/गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ( ५०० रुपये ), थुंकणे (२५० रुपये), खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ (३०० रुपये ), लघवी करणे (५०० रुपये), शौच करणे (५०० रुपये), मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (५०० रुपये), सार्वजनिक ठिकाणी भांडी / कपडे/ इतर कोणत्याही वस्तू धुणे (३०० रुपये), वाहन धुणे (५०० रुपये), अंगण स्वच्छ न ठेवणे (एकाच जागेच्या मालकांसाठी / रहिवाशांसाठी ५०० आणि इतरांसाठी १५००), कचरा वर्गीकरण न करता व स्वतंत्र डब्यांमध्ये साठवून न ठेवता सुपूर्द केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी (वैयक्तिक २०० रुपये आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांसाठी १००० रुपये), अनधिकृत किंवा नियुक्त नसलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा अस्ताव्यस्तपणे टाकणे (प्रतिवाहन २० हजार रुपये), विनापरवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे (प्रतिवाहन २५ हजार रुपये), सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करून न देणे (२०० रुपये), बागेतील कचरा व झाडांची छाटणी निर्दिष्ट केल्याप्रमाणे न करणे (२०० रुपये), व्यावसायिक कारणांसाठी/मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (१० रुपये); मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करून न देणे (७५० रुपये ), कंटेनर/कचरा टोपली/ कचरापेटी नसलेले विक्रेते /फेरीवाल्यांसाठी (७५० रुपये ), कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करून न देणारे विक्रेते/ फेरीवाले (७५० रुपये), घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे (५०० रुपये), पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे (१००० रुपये), सार्वजनिक मेळावा/ कार्यक्रमानंतर ४ तासांच्या आत स्वच्छता न करणे (स्वच्छता ठेव जप्त करणे) या उपविधींचा समावेश आहे.