चिरंतना भट्ट
मुंबई : नरिमन पॉइंट येथील 'फ्री प्रेस हाऊस'च्या एफपीएच गॅलरीमध्ये वर्ल्ड प्रेस फोटोच्या ‘डाऊन टू अर्थ : क्लायमेट चेंज अँड क्लायमेट फ्युचर्स’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ॲमस्टरडॅमच्या महापौर फेमके हाल्सेमा यांच्या हस्ते आज २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारतात प्रथमच मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात हवामान बदल, पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणारे पुरस्कारप्राप्त २१ छायाचित्र प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. वर्ल्ड प्रेस फोटो, नेदरलँड्सचा वाणिज्य दूतावास आणि मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हाल्सेमा यांच्या हस्ते उद्घाटन होणारे भारतातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक छायाचित्र पत्रकारितेचा हा संग्रह मुंबईकरांसाठी खुला आहे. या प्रदर्शनात दोन परस्परपूरक विषयांवर भर देण्यात आला आहे. जगभरात होत असलेली पर्यावरणाची हानी आणि तिला तोंड देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, अशा दोन दृष्टिकोनांतून छायाचित्र प्रकल्प साकारण्यात आले आहेत. जीवाश्म इंधनाचे उत्खनन, वाढता कचरा, समुद्राची वाढती पातळी, जंगलातील वणवे आणि दुष्काळ यांचे चित्रण करण्यात आले असून भूभाग, उपजीविका आणि समाजावर होणारा त्यांचा परिणामही अधोरेखित करण्यात आला आहे.
यासोबतच पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न, संवर्धन आणि संघर्ष-चळवळीच्या कथाही या प्रदर्शनात आहेत. पर्यायी ऊर्जास्रोत, अन्न उत्पादनासाठी वैज्ञानिक पद्धती आणि निसर्गाशी सुसंगत असलेल्या आदिवासी समुदायांच्या परंपरांचा वेधही प्रदर्शाने घेण्यात आला आहे. पर्यावरणाचे नुकसान रोखण्यासाठी जमीन आणि परिसंस्थांचे संरक्षण करणाऱ्या चळवळींचेही दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
सांख्यिकी, धोरणात्मक उद्दिष्टे आणि वैज्ञानिक अहवालांमधून अनेकदा मांडल्या जाणाऱ्या हवामान बदलाच्या विषयाला या छायाचित्र प्रकल्पांनी मानवी आयाम दिला आहे. पर्यावरणीय प्रश्नांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध आणि त्यावर मात करण्यासाठी समुदायांकडून वापरले जाणारे ज्ञान व सामूहिक प्रयत्न यांचे चित्रण या छायाचित्रांतून केले आहे.
नामवंतांच्या कलाकृती अनुभवण्याची संधी
आमी व्हिटाले, अनुष बाबाजान्यान, जॅस्पर डोएस्ट, कादिर व्हॅन लोहुइझेन, केटी ऑर्लिन्स्की, लालो दे अल्मेडा, मॅथ्यू ॲबॉट आणि सिमोन ट्रामोंटे यांच्यासह अनेक नामवंत छायाचित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शनात पाहता येतील.
देशोदेशीच्या कहाण्या...
या प्रदर्शनात अनेक देशांतील पर्यावरणविषयक कहाण्यांचे संकलन पाहता येईल. पर्यावरणाच्या विनाशाची व्याप्ती आणि बदल घडविण्याच्या शक्यता यांचे विविध दृष्टिकोनातून घडवलेले दर्शन हे या प्रदर्शानाचे वैशिष्ट्य आहे. केवळ पर्यावरणीय हानीचे दस्तऐवजीकरण करण्यापुरते मर्यादित न राहता, भविष्यातील हवामान परिस्थितीला सुरक्षित करण्य़ासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही वेध प्रदर्शनात घेण्यात आला आहे.