Mumbai : एकसमान फेरीवाला स्टॉल्स; पर्यटनाला चालना आणि पादचाऱ्यांसाठी सुविधा  
मुंबई

Mumbai : एकसमान फेरीवाला स्टॉल्स; पर्यटनाला चालना आणि पादचाऱ्यांसाठी सुविधा

ऐतिहासिक कुलाबा काॅजवे रोडवर पात्र फेरीवाल्यांना ९१ एकसमान स्टाॅलचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेकडून २.२८ कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. शहरातील फेरीवाले व्यवसाय अधिक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : ऐतिहासिक कुलाबा काॅजवे रोडवर पात्र फेरीवाल्यांना ९१ एकसमान स्टाॅलचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेकडून २.२८ कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. शहरातील फेरीवाले व्यवसाय अधिक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

२०२४ मध्ये कुलाबा कॉजवेच्या विकासाची संकल्पना मांडताना एकसमान स्टॉल्स, दुकानांचे एकसारखे नामफलक आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पालिकेकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे असलेल्या पात्र फेरीवाल्यांना एकसमान स्टॉल्स उपलब्ध करून देणारा कुलाबा हा मुंबईतील पहिला परिसर ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम जिल्हा नियोजन व विकास समिती निधीतून अर्थसहाय्यित करण्यात आला आहे.

...तर मोठे खरेदी केंद्र म्हणून नावारूपाला येईल

नार्वेकर पुढे म्हणाले की, पात्र फेरीवाल्यांना एकसमान स्टॉल्स उपलब्ध करून दिल्यामुळे मुंबईतील पादचाऱ्यांची ये-जा अधिक सुलभ होईल. कुलाबा कॉजवेसारख्या भागात खरेदीसाठी हजारो नागरिक आणि परदेशी पर्यटक नियमितपणे भेट देतात. या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास कुलाबा कॉजवे हे जागतिक दर्जाचे खरेदीचे केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

एकसमान आकर्षक स्टॉल्स

स्टॉल्सच्या उभारणीचे कंत्राट मे. पुष्पम इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्येक स्टॉलचा आकार अंदाजे १ x १ मीटर असणार आहे. फेरीवाल्यांना सोयीस्कर व्यवसाय करता यावा आणि रस्त्यावरून पाहताना संपूर्ण परिसराला एकसमान, आकर्षक स्वरूप प्राप्त व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कुलाब्यातील पर्यटनाला चालना

एका स्टॉलचा नमुना यापूर्वी कुलाबा कॉजवे येथे ठेवण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये विशिष्ट स्टॉल्सची येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होतील. सर्व स्टॉल्सची रचना एकसमान आणि शिस्तबद्ध ठेवल्यामुळे येथील उत्साही फेरीवाले व्यवसाय आणि पादचाऱ्यांची मुक्त हालचाल यांच्यात योग्य समन्वय साधला जाईल. या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल आणि कुलाब्याच्या पर्यटन आकर्षणातही लक्षणीय वाढ होईल, असे मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

Mumbai : कचरा वाहतुकीच्या कंत्राटात ३८ कोटींची वाढ; के.एम.एस. कंपनीला पुन्हा मुदतवाढ, मूळ १२२ कोटींचे कंत्राट १६१ कोटींवर

Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव

राहुल गांधी यांचा १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...