मुंबई : नोव्हेंबर २०२२ पासून मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीकटचे करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. सिमेंट काँक्रीकटचे रस्ते होत असल्याने खड्डे पडण्याचे प्रमाण घटले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. काँक्रीटीकरणामुळे खड्डे बुजवण्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत होत आहे.
खड्डेमुक्त मुंबईतील रस्ते, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीकटचे करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाला सप्टेंबर २०२२ मध्ये दिले होते.
त्यानंतर पहिल्या टप्प्यात सुमारे ६ हजार कोटींच्या निविदा काढत जानेवारी २०२३ मध्ये सिमेंट काँक्रीकटचे रस्ते करण्याच्या कामास सुरुवात झाली, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटींच्या निविदा काढत सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
आतापर्यंत ६७.८ टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून पुढील दोन महिन्यांत ८० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला. मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यात खड्डे बुजवण्याच्या कामासाठी निविदा काढते.
यंदाही निविदा काढण्यात येणार आहे. यावेळीही मात्र खड्डे भरणा कामाच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला गती दिली जात आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याच्या खर्चात कपात केली जात असून २०२४ मध्ये साधारण ३० टक्के कपात केली आणि महापालिकेच्या सात झोनमध्ये हा खर्च १६१ कोटी रुपयांपर्यंत आणला. २०२५ मध्ये ५१ टक्केपर्यंत खर्चात कपात करण्यात आली.
त्यामुळे मुंबईतील खड्डे भरणासाठी हा खर्च आणखी कमी झाला आणि तो ७९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. आता या खर्चात आणखी कपात करण्यात येणार असून त्यावर काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या पाच वर्षांतील खड्ड्यांची आकडेवारी
वर्ष खड्डे
२०२० - ६५,६१७
२०२१ - ४३,४७८
२०२२ - ३८,३१०
२०२३ - ७२,०००
२०२४ - ३५,०००
२०२५-२६ - २२,८६९