शाळेच्या गेटवर भावासोबत सेल्फी काढताना पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचा चिरडून मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

शाळेच्या गेटवर भावासोबत Selfie काढताना मुंबई पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचा चिरडून मृत्यू

शालेय सहलीसाठी लहान भावाला सोडायला आलेल्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीचा स्कूल बस आणि शाळेच्या गेटदरम्यान चिरडून मृत्यू झाला

Swapnil S

विरार : शालेय सहलीसाठी लहान भावाला सोडायला आलेल्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी विरारमधील गोचारपाडाजवळ घडली.

विरार येथील नरसिंह गोविंद वर्तक (एनजीव्ही) शाळेतील विद्यार्थी घाटकोपरमधील किडझानिया येथे पिकनिकसाठी जाण्याच्या तयारीत असताना सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धी फुटाणे असे मृत तरुणीचे नाव असून ती पाचवीत शिकणारा तिचा भाऊ ओम याला बसमध्ये सोडण्यासाठी गेली होती. विद्यार्थी बसमध्ये चढत होते आणि पालक निरोप घेत होते, त्यावेळी चालकाने बस रिव्हर्स घेतली असता सिद्धीला बसची धडक बसली.

सेल्फी घेताना सिद्धीला चिरडले

सिद्धी बसजवळ सेल्फी घेत होती, त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. खड्ड्यामुळे मागील टायर आदळल्याने नियंत्रण सुटल्याचे चालकाने सांगितले. यामुळे सिद्धी बस आणि शाळेच्या गेटदरम्यान चिरडली गेली.

इतर पालक व उपस्थितांनी सिद्धीला तातडीने विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले. पण, वैद्यकीय उपचारानंतरही काही तासांतच तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे फुटाणे कुटुंबीयांना अपघाताची माहिती शाळा प्रशासनाने दिली नव्हती. एका अनोळखी व्यक्तीने तिचा फोन रिसीव्ह केल्याने त्यांना ही दु:खद बातमी कळली.

शाळा प्रशासनाने नाही दिली माहिती

सिद्धीचे वडील, नायगाव शस्त्रास्त्र विभागाशी संलग्न असलेले मुंबई पोलीस हवालदार, यांनी शाळा प्रशासनाने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. या अपघाताबाबत शाळेने कोणतीही माहिती दिली नाही. अनपेक्षित कॉलद्वारे माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बसचालकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी विरार पोलिसांनी बसचालक रोहन संजय साळवी (वय २४) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्याला अटकही करण्यात आली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक