मुंबई : पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घनकचरा आदी मुंबईकरांशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक कार्यरत असतात. परंतु नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनात अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांचे मानधन महिना १ लाख रुपये, प्रवास भत्ता १५ ते २० हजार रुपये देण्यात यावे, याकडे समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र देत लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक हे दोघेही जनतेकडून थेट थेट निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. तरी नगरसेवकांना मिळणाऱ्या अधिकार, मानधन, सुविधा व कायदेशीर संरक्षणामध्ये लक्षणीय तफावत आढळते, जरी नगरसेवक मुंबईतील सुमारे १.२ कोटी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या नागरी कामांशी थेट निगडित असतात. बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून सन २०२६-२७ साठी अंदाजपत्रक ८० हजार ९५२ कोटी आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, आपत्ती व्यवस्थापन व नागरिकांच्या तक्रारी यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. मात्र वाढीव मानधन व सुविधा यांपासून नगरसेवक अनेक वर्षांपासून वंचित आहेत. कर्मचारी सहाय्य, प्रवास सुविधा, वैद्यकीय सुविधा व पदाची प्रतिष्ठा नसल्यामुळे जनतेची सेवा प्रभावीपणे करणे कठीण होते. ७४ व्या घटनादुरुस्तीच्या भावनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे.
पत्रातील प्रमुख मागण्या
मासिक मानधन किमान १ लाखांपर्यंत वाढविणे.
वैयक्तिक सहाय्यक सचिव नेमण्यासाठी २५ हजार प्रतिमाह भत्ता देणे
प्रतिमाह १५ ते २० हजार प्रवास भत्ता
स्वतः व कुटुंबासाठी महानगरपालिका/शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा
प्रभागात आवश्यक सुविधा असलेली स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देणे
महानगरपालिका सभा व प्रभाग समित्यांमधील प्रामाणिक वक्तव्यांसाठी मर्यादित कायदेशीर संरक्षण देणे
किमान एक कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर वाजवी निवृत्तीवेतन योजना सुरू करणे
सर्व नगरसेवकांना समान निधी द्यावा - साटम
मुंबई : निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. आता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीच अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आलेला अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांना समान निधी वाटप करण्यात यावे, असे पत्र स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना लिहिले आहे.
मुंबई महापालिकेचा २०२६-२७ चा ८०,९५२.५६ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे. स्थायी समितीच्या अधिकाराखाली ८०० कोटींचा विकासनिधी मंजूर केला. मात्र ८०० कोटींच्या निधीवाटपात विरोधकांची काही लाखांवर बोळवण केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. निधीवाटपात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त निधी वाटप केल्याचे १६ एप्रिलपूर्वी निदर्शनास येताच, याची सविस्तर माहिती घेतल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांना देण्यात आलेला अतिरिक्त निधी देण्यात आला असून, तो अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांमध्ये समतोल व न्याय्य निधी वाटप करण्यात यावे, असे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.
आमदार व नगरसेवकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये तफावत
आमदार : १ लाख ६० हजार ते २ लाख ५० हजार मानधन
पालिका नगरसेवक - २५ हजार, (२०१७ पासून बदल नाही)
आमदार : मोफत रेल्वे/विमान प्रवास, वाहन सुविधा, वैयक्तिक सहाय्यक, चालक सुविधा
पालिका नगरसेवक - स्वतंत्र कर्मचारी नाही, मर्यादित प्रवास भत्ता, निवासी किंवा व्यापक वैद्यकीय सुविधा नाही